झोपी गेलेला ...
प्रिय, नुकताच म्हणे ‘जागतिक निद्रा दिवस’ झाला. काय कमाल आहे नाही हे दिवस, I mean , days ठरवणाऱ्यांची! कसे शोधून काढतात मर्मस्थानं लोकांची! झोप हा माझ्या सारख्या ‘सूर्यवंशी’साठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. शाळा, कॉलेजात असताना झोप आवरणं महाकठीण वाटायचं मला. अजूनही झोप पूर्ण नाही झाली की अपचन होतं. आणि पुढचा सगळा दिवस चिडचिड! मोठं होताहोता, झोपेच्या ना ना रंगछटा उलगडत गेल्या. अभ्यास रात्री जागून करायचा म्हणून डोळ्यावर न येणारी झोप आणि प्रेमात पडल्यावर दोघे सोडून ‘बाकी जगाला वाटून टाकावी’ वाटणारी झोप यात बरीच तफावत होती. पहिल्या प्रकारात खटाटोप तर दुसऱ्या प्रकारात विनासायास जागरण! बरं त्यातही सगळं आलबेल असताना ‘गुंगारा’ देणारी झोप आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यावर ‘उडणारी’ झोप पण वेगळी. ते म्हणतात न प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, ते त्यावेळी झोपेलाही लागू बरं! रात्रभर जागरण झाल्याने होणारे दुष्परिणाम पण माफ होतात. गदधे पंचविशी संपता संपता सगळ्या भूमिका बदलायला लागतात तशा झोपेच्या ही तऱ्हा बद...