healing
प्रिय, एखाद्या कामाच्या निमित्ताने किंवा फिरायला म्हणून, काही दिवसांची किंवा अगदी एखाद दिवसाची बाहेरची मोठी, दमवून टाकणारी फेरी करावी लागली; की जवळपास सगळ्यांना येणारा अनुभव म्हणजे शेवटचे दिवस/तास सरता सरत नाहीत. थकून जातो जीव. कधी एकदाचे घरी पोहोचतो असं होऊन जातं. आणि घराजवळ पोहोचेपर्यंत आणलेलं उसनं अवसान, घर दिसताच गळून पडतं. एक एक पाऊलसुद्धा उचलणं कठीण होतं. एकदा का घरात अंग झोकून दिलं की काय तो जीव शांत होतो! आजारी असताना, हॉस्पिटलमध्ये असलो, तर डॉक्टर आणि सगळ्या औषधांच्या मध्ये safe वाटायला हवं खरं. तरी जीव कावून जातो आणि घरी गेल्यावरच काय ते बरं वाटेल मला, असं सगळ्यांना सांगतो. आणि खरंच घरीच बरे होतो. नाही का? असं घर बरं करतं. इथे सुरक्षित वाटतं. शांत होतं मन. उसनी अवसानं नाही आणावी लागत. कारण थकलेलं, आजारी, चिडलेलं, हरलेलं असं कसंही असलो तरी घर सांभाळून घेतं. Healing चं feeling इथेच येतं. अशीच काही माणसं सुद्धा असतात, असावी आयुष्यात जी घराचं काम करतात आपल्यासाठी. बाहेरच्या जगात त...