सीमोल्लंघन
प्रिय, घटस्थापना होऊन नवरात्र संपले सुद्धा. गरबे काही घुमले नाहीत यंदा कुठे मात्र, दरवर्षी प्रमाणे सोशल मीडिया वर स्त्री शक्तीचे आणि मागोमाग ‘केवळ नऊ दिवसच नको तर उरलेले 356 दिवस पण बायकांना कमी लेखू नका’ असे मेसेजेस सुद्धा आलेच. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी ठीक. बायकांचं काय मात्र? माझ्या ओळखीत काही मैत्रिणी अशा आहेत ज्यांना बाई म्हणून जन्माला आल्याची खंत वाटते. तर काहींना ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत सतत अलका कुबल च्या फिल्मी भूमिकेत (प्रत्यक्षात त्या ही तशा नाहीत हो!) घुसून बसावं वाटतं. कुणाला मन मारत जगायचा मक्ता आपल्याच पदरी का असा प्रश्न, तर कुणाची पाळी बायकांच्याच माथी का मारली यासाठी थेट देवापाशी चिडचिड! या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरुषांनीच केवळ respect ठेवून कसं चालेल नाही का? प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ‘आपणही’ आपला मान राखायला पाहिजे. 365 दिवस!!! आपणच फ्रेम तयार करतो बाई म्हणून जगण्याची. काही ऐकीव आणि काही पाहिलेल्या चौकटींवरून. कुणा सखीला सकाळचा पहिला चहा निवांतपणे घ्यायला आवडतो. पण उठल्यासरशी ती सगळ्यांच्या दीमतीला हजर होणार आणि दुपारहून चुकचुकणार...