आवाज हा ...

 प्रिय,

किचन मध्ये स्वयंपाक करताकरता टीव्ही वर सुरू असलेले आणि बघता येत नसल्याने फक्त कानावर पडणारे कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचा Brain Game च वाटतो मला. गाणी असतील तर गाण्यावरच्या dance ची choreography नजरेसमोर येणे, संवाद ऐकून कार्यक्रम, कलाकार, त्यांचे हावभाव ओळखणे, आणि डोक्याला ताण देऊनही ओळखू येत नसेल तर हातातलं काम टाकून उत्तर शोधायला जाणे, आपला असा वेगळाच कार्यक्रम चालतो माझा. अशा आवाजाच्या करामती मजेशीर वाटतात मला.

अचानक कुणाचा तरी कॉल येतो आणि “ओळखलंस का?” अशी विचारणा होते. त्यात अपेक्षित असतं ‘आवाजावरून guess करणे’ कारण मोबाइल वर दिसणारा नंबर अनोळखी असतो. सर्प्राइज टेस्ट वाली feeling येते अशावेळी. बरं समोरून options पण येत नाहीत. हाही कानांना अन डोक्याला व्यायामच. कारण आवाजाच्या करामती मजेशीर असतात.

प्रचंड गर्दीच्या ठिकाणी, जत्रेत किंवा लग्नात, कधी ट्रेन मध्ये गजबजाटात ओळखीचा स्वर कानावर पडतो. कानच शोधू लागतात आवाजाला आणि नजर टिपते आवाज. ओळखीचा चेहरा दिसताच क्षणी साद घातली जाते. ‘इतक्या वर्षांनी भेटूनही निव्वळ आवाजावरून कसं ओळखलं’ हे समोरच्या इतकंच आपल्यालाही आश्चर्यात पाडतं. कशा आवाजाच्या करामती मजेशीर असतात ना.

खास आवाजाची, कानाचे द्रोण करून वाट पहाणारं कुणी असतं, कधी कुणाचा सूर ‘कर्णकटू’ वाटून कान ही मिटून घ्यावे वाटतात. कधी कान ‘किटले’ तरी काही आवाज अपरिहार्यपणे ऐकावे लागतात. तर केवळ ‘हॅलो’ वरुन मनाचा अंदाज घेणारे ‘मनाचा ठाव’ ही घेतात. अशाही आवाजाच्या करामती मजेशीर असतात.

काही आवाज मनात रेकॉर्ड होतात. अंतर, काळाची सीमा पार करून कानात वाजत राहतात. काळाच्याही पडद्याआड गेलेले आवाजाचा echo तेवढा ठेवून जातात. त्यांनी मारलेली हाकदेखील स्वर, हेल, गतीसकट, जशीच्या तशी कानात नाही तरी मनात ऐकू येते. कारण आवाज ‘विरतो’ हे खरं असलं तरी ‘मनात मुरतो’ हेही खोटं नाही. एवढी चांगली sound recording system शोधूनही सापडणार नाही बाहेरच्या जगात.

अरे वाह! अचानक 24/7 recording studio मध्ये आल्यासारखं वाटलं मला. कुठे कुणाच्या मनात कसा रेकॉर्ड होईल, सांगता येत नाही बुवा आवाज. ‘बराच’ झालेला बरा.
नाही का?

कळावे.
आनंदमयी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट