सुवर्णमध्य
प्रिय, माझी एक सखी एकदम सडेतोड बोलणारी. आपण कौतुकाने काही सांगावं, दाखवावं की, ‘बरं आहे, पण...’ अशी सुरुवात करून स्पष्टवक्तेपणा जागा होतो तिचा. आणि त्याविरुद्ध दुसरी एक सखी! अगदीच टाकावू कामगिरीला सुद्धा असं प्रोत्साहन देईल की बेडकीला बैलाएवढं मोठं व्हायचा मोह व्हावा. एकीच्या घरी पाऊल टाकलं की पसारा, अव्यवस्थितपणा! इतका की आपणच पदर खोचून कामाला लागावं (प्रतीकात्मक बरं!) असं वाटतं. तर दुसरीकडे घरात पाऊल टाकलं केवळ तर त्यामुळेही स्वच्छतेला गालबोट लागेल की काय अशी भीती. एका सासुरवाशीण सखीने सासुबाईंनी टोमणा मारला म्हणून अत्यंत प्रिय पदार्थ सोडला. तर त्या विरुद्ध डॉक्टर किंवा आपली तब्येत काहीही म्हणो, खाण्यावरचा ताबा काही मिळवता येत नाही; अशाही व्यक्ती बघण्यात आहेत. उदहारणं वेगवेगळी असली तरी समान धागा एक... सगळेच टोक गाठणारे! आपणही गाठतो नकळत काही वेळा. पैशाची उधळपट्टी करणं वा कंजूष स्वभाव असणंही त्यातलंच. तसंच ‘अमुक कुणाशी काही झालं तरी बोलणार नाही’ सारख्या बतावण्या केलेल्या किंवा ऐकलेल्या असतात. कधी कुणाचं मन राखण्या...