सुवर्णमध्य

 

प्रिय,

   माझी एक सखी एकदम सडेतोड बोलणारी. आपण कौतुकाने काही सांगावं, दाखवावं की, ‘बरं आहे, पण...’ अशी सुरुवात करून स्पष्टवक्तेपणा जागा होतो तिचा. आणि त्याविरुद्ध दुसरी एक सखी! अगदीच टाकावू कामगिरीला सुद्धा असं प्रोत्साहन देईल की बेडकीला बैलाएवढं मोठं व्हायचा मोह व्हावा.

   एकीच्या घरी पाऊल टाकलं की पसारा, अव्यवस्थितपणा! इतका की आपणच पदर खोचून कामाला लागावं (प्रतीकात्मक बरं!) असं वाटतं. तर दुसरीकडे घरात पाऊल टाकलं केवळ तर त्यामुळेही स्वच्छतेला गालबोट लागेल की काय अशी भीती.

   एका सासुरवाशीण सखीने सासुबाईंनी टोमणा मारला म्हणून अत्यंत प्रिय पदार्थ सोडला. तर त्या विरुद्ध डॉक्टर किंवा आपली तब्येत काहीही म्हणो, खाण्यावरचा ताबा काही मिळवता येत नाही; अशाही व्यक्ती बघण्यात आहेत.

    उदहारणं वेगवेगळी असली तरी समान धागा एक... सगळेच टोक गाठणारे! आपणही गाठतो नकळत काही वेळा. पैशाची उधळपट्टी करणं वा कंजूष स्वभाव असणंही त्यातलंच. तसंच ‘अमुक कुणाशी काही झालं तरी बोलणार नाही’ सारख्या बतावण्या केलेल्या किंवा ऐकलेल्या असतात. कधी कुणाचं मन राखण्यासाठी इतकं झुकतं माप घेतलेलं असतं की, क्वचित कधी स्वतःचं मत मांडायला गेलं की उद्धट वाटतं. टोकाचा अट्टाहास, राग किंवा अढी मनात ठेवून जगण्यात दमछाक ती किती होत असेल!

    म्हणून सुवर्णमध्य साधता यायला हवा. रोजच्या जगण्यात. माणसं जोडून ठेवण्यासाठी. नाती टिकवण्यासाठी. गाठी सोडवण्यासाठी. अगदी निवांत जगण्यासाठी.

     Extreme level ला जाऊन करता येण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. कामात किंवा एखाद्या skill मध्ये dedication मुळे शिखर गाठणारे आदर्श कमी नाहीत जगात. आपलं शिखर सापडेपर्यंत, जगण्यात इतरत्र सुवर्णमध्य गाठता येतो का पाहायचं.

तोपर्यंत,

कळावे,

आनंदमयी

 

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर

    ReplyDelete
  3. खरंय सुवर्णमध्य गाठता येणं जमलं पाहिजे,खूप छान लेख🤗

    ReplyDelete
  4. Balance राखता आला पाहिजे extreme level चा खूपच त्रास होतो आणि कधी कधी इतरांना कमी स्वतःला जास्त होतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट