आशेचं फूल

प्रिय,

पावसाळा म्हणजे वृक्षारोपणाचा देखील उत्साह! आम्हीही परवा ‘वृक्षारोपण’ जरी नाही तरी काही फुलझाडांची बीजं पेरली. सोबत काही कुंड्यांच्या जागा बदलल्या. त्यांनाही तेवढीच हवापालट! आता यात ‘आम्ही’ म्हणजे अहो च बरं. माझी आपली अशीच मधेमधे लुडबूड. मला पाणी तेवढं घालता येतं रोपांना.

तर झालं असं, कुंड्यांची जागा बदलताना थोडा चिखल झाला, काही पानं गळाली, एका फुलझाडाची फांदी तुटली (आता त्याला ‘फांदी तरी म्हणावं का’ असा प्रश्न पडावा इतकी ती नाजुक आणि छोटी). झालेला पसारा आवरेन म्हणता मी सगळा ‘टाकाऊ कचरा’ फेकून देण्याच्या तयारी असताना नवरोबा ने तुटलेला तुकडा घेतला आणि पुन्हा त्या फुलझाडाच्या कुंडीत रोवला. मी म्हंटलं, “आता काय रुजणार थोडीच ते?” तर ते म्हणाले, “अशीच रुजतात झाडं.”

आणि आज सकाळी पहाते तर त्या तुटून गेलेल्या, किडमिडया फांदीला गोंडस फूल उमललं!

कित्ती सहज आहे ना? रूजायचं ठरवलं तर कुठेही, कसंही रुजता येतं! Willingness पाहिजे फक्त.

ह्या फुलाचंच उदाहरण द्यायचं झालं तर हे आजच दुपारी कोमेजून सुद्धा गेलं! तरी जिद्द पहा ना जगण्याची! अल्प असलं तरी आयुष्य वाट्याला आलं आणि ते उमलवून टाकलं फुलाने. कसलं proud feel झालं असतं त्या रोपाला जर सांगून व्यक्त होता आलं असतं!

कुंडी जागची हलवण्यापासून ते मूळ रोपापासून तुटून पडेपर्यंत, नुकसान होण्याच्या कल्पनेने ही किती धाकधूक वाटली असेल. तुटून ‘टाकाऊ’ मध्ये भर पडल्यावर तर ‘सगळं संपलं’ हेच आलं असेल मनात. केराच्या टोपलीत तर ‘पुरून’ ही टाकलं असेल स्वतःला. अशात अचानक कुणी रुजायला एक संधी देऊ करतंय पाहून जीवाच्या आकांताने प्रयत्न केले असतील आणि ‘पुरून घेण्याऐवजी रुजण्याचा निश्चय’ मनाने बांधला असेल.

त्याचा struggle जरी त्याने मला सांगितलं नसला, तरी success story माझ्या समोर होती! सकाळी उठल्याउठल्या फुल पाहून माझ्या मनातही आनंद फुलला. सोबत दुर्दम्य आशेचं आणखी एक आनंददायी बीज पेरल्या गेलं. म्हंटलं चला तुमच्यापर्यंत त्याचा सुगंध पोहोचवता आला तर पाहू.

 आयुष्य सुंदर आहे. परिस्थिती कशीही ओढवली तरी तग धरून ठेवायचा.. कोण जाणे कधी त्या सौंदर्याचा साक्षात्कार होईल! ओढ तेवढी सौंदऱ्याचीच हवी. हो ना?

 

कळावे,

आनंदमयी 

ताजा कलम: सोबत 'आशेचं फूल' जोडत आहे. 


Comments

  1. असेच आशेचा किरण दाखवणारे लेखन करत रहा ....हे एका फुलाचंच नाही तर स्त्री जीवनाचंही सत्य आहे... रुजायचं ठरवलं तर खरंच कुठेही रुजता येतं आणि रुजण्याची गंमत खूप वाढते जेव्हा हिंमत आणि संधी देणारं कोणी असतं...

    ReplyDelete
    Replies
    1. Mast aayushy hi asch ahe ashecha kiran nehmich asla na ki sundar hot aayushy

      Delete
    2. छानच लेख आहे ,अगदि प्रत्येकाच्या नेहमीच्या आयुष्याशी ही संबधित अशी गोष्ट पण नेमक्या शब्दांत कसे मांडावे हे तुमच्या कडून शिकावे 👍

      Delete
  2. अप्रतिम लेखन आणि त्यातील आशयही... निसर्ग आपल्याला खूप काही देतो, वेळ प्रसंगी शिकवतो, बळ देतो आणि घडवतोही, हे खरं आहे...
    आणि त्या छोट्याशा फांदीच्या फुलण्याच्या दुर्दम्य आशेचा सुगंध तुझ्या प्रत्येक शब्दांतून वाचकांच्या मनापर्यंत थेट पोहोचतो आहे आणि आशयाचा मंद दरवळही त्या फुलाच्या चित्रातून जाणवतो आहे... Love you...

    ReplyDelete
  3. Surekh lekh.chhan relate kela ahes.hirwi gaar feeling ali

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गिफ्ट