गिफ्ट
प्रिय,
लहान असताना आई किंवा पप्पा कोणाचाही वाढदिवस असला की त्यांनीच दिलेल्या पॉकेट मनीमधून (कितीही असला तरी त्यातून काटकसर करून वाचवलेला ) त्यांच्या साठी आम्ही गिफ्ट आणायचो. पैसे आणि समज दोन्हींच्या मानाने प्रेम जास्त असायचं त्यात अर्थातच. मग कधी पप्पा असा खर्च केला म्हणून थोडे रागवायचे. त्याला कारणही तसंच म्हणा, त्यांचं प्रेम! ‘तुम्हाला खर्चायला दिलेले पैसे परत माझ्याचवर कशाला खर्च करता’ असा एकूण सूर. मात्र अक्कल कमी असल्याने तेव्हा वाटायचं आपण प्रेमाने आणलं आणि त्यांना आवडलं नाही की काय!?
मोठे होत गेलो तसे गिफ्ट करावं अशी माणसं वाढत गेली. वाढदिवस, friendship day, एखादी achievement वगैरे च्या निमित्ताने गिफ्ट देणं आणि घेणं वाढलं. मला आठवतं, दहावी पास झाले म्हणून गुड्डी ताई म्हणजे माझी मामे बहीण, माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली होती खास! कुठे फिरायला गेल्यावर हमखास आपली माणसं आठवतात आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या जातात आपसूकच. काही निमित्त देखील खास खास होत जातात आणि गिफ्ट्स ची value वाढत राहते. जसं केवळ प्रियकर असताना नवरोबा ने दिलेलं गिफ्ट, जे अजूनही जपून वापरण्याकडे कल असतो!
काळ पुढे सरकला तसं अचानक कधीतरी ‘आई तुझ्या साठी गिफ्ट’ असं म्हणत लेक एखाद्या कागदाच्या चिटोऱ्यावर काहीबाही तोडकं मोडकं घेऊन यायला लागली... आणि गिफ्ट प्रकरणाची वेगळीच ओळख झाली. इतक्या निर्मळ मनाने दिलेलं कोणतंही गिफ्ट कितीही तकलादू (टिकण्याच्या दृष्टीने)असलं तरी त्या सगळ्यासाठी खास जागा केली जाऊ लागली. त्याच्या दर्जावरून नाही तर ते देण्यामागे असलेल्या निव्वळ प्रेमाने त्या त्या वस्तूला वजन प्राप्त व्हायला लागलं.
या सगळ्या गिफ्ट प्रकरणात महत्वाचा बदल झाला तो प्रेम स्वीकारण्याच्या दृष्टिकोनात. कुणी आपल्यासाठी efforts टाकून जेव्हा काही खास करतं तेव्हा ते तितक्याच मनापासून आढेवेढे न घेता स्वीकारणं शिकले मी. प्रेमाच्या अभिव्यक्ती प्रती माझा आदरभाव म्हणून असेल कदाचित, मात्र असा स्वीकार हा सहजभाव व्हायला लागला.
होतं काय की, कधीकधी formality म्हणून किंवा ‘काय गरज या सगळ्याची’ असं म्हणत आपण समोरच्याची भेटवस्तू स्वीकारायला सहज नकार देतो, व्यक्त करण्यापासून रोखतो आणि एक प्रकारे त्याच्या प्रेमावर अटकाव लादतो. जेव्हा कुणी खास काही शोधतं कुणासाठी, तेव्हा केवढा तो रिसर्च होतो. गिफ्ट देण्याचं निमित्त, त्या व्यक्तीच्या आवडी निवडी, पर्सनॅलिटी, आपला त्यांच्यासोबतचा बंध असं बरंच काही असतं त्या मागे. हे सगळे efforts म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची एक रीतच की. आपल्या सहज ‘काय गरज हे सगळं करण्याची किंवा कशाला करत बसायचं एवढं’ असं म्हणण्याने त्या सगळ्या प्रामाणिक भावनेवर हलकासा सुराच फिरतो. खूप मनापासून करतं कुणी कुणासाठी काही....आणि ते जर समोरच्याने त्या जाणीवेने नाही घेतलं तर जास्त वाईट वाटतं.
अशावेळी नाकारण्याचा मोह टाळून, वस्तूपेक्षा त्यामागच्या भावनेसाठी हलकेच हसून स्वीकार केल्याची पोचपावती दिली तर…काय हरकत आहे काहीच आढेवेढे न घेता वस्तू इतकंच देण्याच्या भावनेला दाद द्यायला ... छोट्या छोट्या निमित्तानी चिमुकल्या विद्यार्थ्यानी दिलेले गुलाब किंवा पेन अशाच प्रेमाची उदाहरणं; ती नाकारण्याची काय बिशाद बाईंची!
निर्भेळ मनाने कुणासाठी काही करणारी माणसं कमी होत असताना, व्यवहाराच्या पलीकडे जाऊन नाती जपू पाहणारी माणसं आयुष्यात असणं ही जर देणगी मानली तर त्यांच्यापुरतं का होईना या घेण्या देण्या कडे आदराने पाहणं जमायला हवं .
हळूहळू हा स्वीकाराचा परीघ भेटवस्तू पासून पुढे, प्रेम, कौतुक ते अगदी टीका आणि सूचना स्वीकारण्यापर्यंत वाढायला हवा.
बघू जमतं का सगळ्यांना.
कळावे,
आनंदमयी
Comments
Post a Comment