कट्टा
प्रिय, शाळेतून सई आणि अर्थातच मी कॉलेजमधून आले की आमची पहिली भेट होते माझ्या आईकडे. तिथं माझी लेक मला सांगते, "आई, आज शाळेत खूप मजा आली. तुला गंमत सांगायची आहे." आणि सांग म्हटलं, की 'आता नाही नंतर' असं म्हणत कधीच ती लगेच सांगत नाही. मग घरी आल्यानंतर बेडरूम मध्ये ‘माझ्यासमोर बस आणि आता ऐक’ असं म्हणत, ती साग्रसंगीत एकेक सस्पेन्स उलगडत सगळं वर्णन करते. भेटल्या भेटल्या सांगितलं असतं तेव्हा जो उत्साह असता, तेवढ्याच उत्साहाने, कुतूहल निर्माण करत, माझ्याकडून हव्या तशा प्रतिक्रिया घेत (हे सुद्धा एक स्किलच आहे) सगळं चित्र माझ्या नजरेसमोर उभं करते. सांगून झाल्या क्षणी, "आता मी जाते खेळायला" असं म्हणून पळते सुद्धा. या सगळ्यांमध्ये, तिला सांगायचा प्रसंग, तिची गंमत याहीपेक्षा, तिच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, ती ते कुठे सांगते आहे ते. तिची माझ्यासोबत ' निवांत ' असण्याची जागा! जिथे ती माझ्यासोबत खुलते. मोकळी होऊ शकते. तिला माहित असतं की इथे आई आपल्याला मनापासून ऐकेल, प्रतिसाद देईल. आपल्या सगळ्यांच्या अशा जागा ठरलेल्या असतात. नाही का? बिल्डिंगच्या खाली असलेला बाकडा...