कट्टा
प्रिय,
शाळेतून सई आणि अर्थातच मी कॉलेजमधून आले की आमची पहिली भेट होते माझ्या आईकडे. तिथं माझी लेक मला सांगते, "आई, आज शाळेत खूप मजा आली. तुला गंमत सांगायची आहे." आणि सांग म्हटलं, की 'आता नाही नंतर' असं म्हणत कधीच ती लगेच सांगत नाही. मग घरी आल्यानंतर बेडरूम मध्ये ‘माझ्यासमोर बस आणि आता ऐक’ असं म्हणत, ती साग्रसंगीत एकेक सस्पेन्स उलगडत सगळं वर्णन करते. भेटल्या भेटल्या सांगितलं असतं तेव्हा जो उत्साह असता, तेवढ्याच उत्साहाने, कुतूहल निर्माण करत, माझ्याकडून हव्या तशा प्रतिक्रिया घेत (हे सुद्धा एक स्किलच आहे) सगळं चित्र माझ्या नजरेसमोर उभं करते. सांगून झाल्या क्षणी, "आता मी जाते खेळायला" असं म्हणून पळते सुद्धा.
या सगळ्यांमध्ये, तिला सांगायचा प्रसंग, तिची गंमत याहीपेक्षा, तिच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, ती ते कुठे सांगते आहे ते. तिची माझ्यासोबत ' निवांत ' असण्याची जागा! जिथे ती माझ्यासोबत खुलते. मोकळी होऊ शकते. तिला माहित असतं की इथे आई आपल्याला मनापासून ऐकेल, प्रतिसाद देईल.
आपल्या सगळ्यांच्या अशा जागा ठरलेल्या असतात. नाही का? बिल्डिंगच्या खाली असलेला बाकडा अशा कितीतरी प्रकारच्या हितगुज ऐकत असेल. कारण तिथे भेटल्यानंतर अनेक जणींना मोकळं होता येत असतं.
शाळा किंवा कॉलेजमध्ये सुद्धा नाही का? आपला एक कट्टा ठरलेला असतो. सगळीकडे फिरून त्या कट्ट्या पाशी आल्यावरच सगळे फुटतात आणि आठवणी तयार होतात. चौकात जर कट्टा नसला तरी कुठला ना कुठला कोपरा, मनाच्या कोपऱ्यात ' कट्ट्याचं ' काम करतो.
तर कधी एक कप चहाच्या बहाण्याने गाठलेली टपरीही मन शांत - निवांत करून जाते.
मी आणि माझी सखी दिवसभर सोबत असायचो, तरी कॉलेज सुटल्यानंतर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी भर रस्त्यात आम्ही आमची निवांत जागा शोधली होती. येता-जाता सगळे हॉर्न देऊन आम्हाला आमच्या गाड्या हलवायला लावायचे. पण आमच्याने काही ती निवांत जागा सोडवली नाही. एका सखीच्या बिल्डिंगचं गेट हा तास दीड तास गप्पांचा कट्टाच होऊन जायचा.
आता तर केवळ कट्टेच नाही तर चॅट बॉक्स सुद्धा मोकळ्या होणाऱ्या मनाचे साक्षीदार होत आहेत.
अशा वेगवेगळ्या जागा शांत होण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्याहून जास्त महत्त्वाचं असतं, त्या त्या जागी आपलं मन ऐकण्यासाठी आपल्या इतकंच आतुर माणूस! एकदा ते सापडलं की गजबजाट सुद्धा निवांत जागा बनते आणि हळूहळू ती व्यक्तीच आपली निवांत जागा होऊन जाते!
जगभर सगळ्यांसोबत कितीही बोललो तरी आपल्या माणसासमोर बोलून रितं झाल्याशिवाय शांतता नाही लाभत.
असे आपापले कट्टे शोधावे नाही लागत, आपसूक तयार होतात आणि एकदा तयार झाले की सोडवत नाहीत. तसंच नकळत कधीतरी आपणही एक कट्टा होऊन जातो. हो ना?
कळावे,
आनंदमयी
Comments
Post a Comment