एक असते शाळा...
प्रिय सख्यानो,
जून महिना आला की कोण धावपळ सुरू होते नाही का आपली सगळ्यांचीच. पावसाळा तोंडावर असतो आणि त्यात शाळा, कॉलेज सुरू होणार म्हंटल्यावर खरेदीला उधाण येतं. यावर्षी चित्र थोडं बदललेलं दिसू शकेल. एरवी ‘नेमेची येतो पावसाळा’ मातीचा आणि कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेऊन! त्या सुगंधा सोबत मी तर जाऊनच बसते माझ्या शाळेच्या बाकावर.
माझी शाळा... शारदा मंदिर. फडणीसांच्या वाड्यात भरणारी. आणि नंतर मोठ्या मैदानाच्या मोठ्या इमारतीत शिफ्ट झालेली. वाड्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला असला (त्याजागी आता रहिवासी इमारत आहे.) तरी माझ्या मनात जशीच्या तशी आहे शाळा. डोळे मिटले की ‘वाड्यात भरणारी शाळा’ आणि ‘शाळेत वसलेला वाडा’ दोन्ही जिवंत होतात. मनाने सगळीकडे फेरी मारून येते मी काही सेकंदात. चौथीपर्यंत वर्गात बसायला एखाद्या वर्षी बाक तर एखाद्या वर्षी सतरंजी. पाचवीला मोठ्या इमारतीत गेल्यावर मात्र चंगळ होती... दरवर्षी बाकच! शाळेच्या दोन्ही वास्तू बालपणापासून टीन एज पर्यंतच्या माझ्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. माझ्याच कशाला तुम्हा सगळ्यांचंही असंच असेल नाही का? नावं काय ती बदलतात शाळेची आणि आपली.
किती काय देते शाळा आपल्याला. शिक्षण तर बेसिक म्हणायचं. शिक्षक जीव तोडून शिकवायचे. मात्र शिकवलेलं सगळंच सगळ्यांना कळेल याची खात्री नाही. विषय तर कदाचित मराठीच आवडत असावा अनेकांना. (गोष्टी, कविता असतात ना त्यात) विज्ञान-गणितात आनंद मानणाऱ्या प्रजातीचे लोक मूठभर केवळ! English मधल्या कविता, sorry poems ना चाल काय लावायची हा यक्षप्रश्न. इतिहास, भूगोल सारख्या विषयांकडून काही फार अपेक्षाच नाही. एकजात सगळ्यांचा आवडता तास कोणता तर PT! बरं शिक्षकांच्या मते, त्यांनी पाहिलेली सगळ्यात बंड, मस्तीखोर, टुक्कार बॅच आपलीच असायची. असं असतानाही शाळेत मात्र जायचंच! ऊन, पाऊस, थंडी काहीही असो. कोण ओढ असायची शाळेत जायची!
या ओढीसाठी मोठं कारण असायचं मित्र मैत्रिणी! कारण long term मैत्रीचाही पाया इथेच घातला जातो. मधल्या सुट्टीत मित्र मैत्रिणींसोबत डबा वाटून खाण्यातली मजा इथेच चाखता येते. पूर्वी कुठे शाळेचे नियम होते ना ‘कोणत्या वाराला काय पदार्थ न्यायचा’ वगैरे? आपण बुवा रात्री उरलेल्या फोडणीच्या भातावर पण पार्टी करायचो! जवळ राहणारे चक्क घरी जाऊन गरम गरम जेवून यायचे. तर कुणी चिंचा आवळ्यांसाठी मधल्या सुट्टीची वाट पहायचे. भूक लागो ना लागो चालू तासाला चोरून डबा खायची हुक्की सुद्धा बऱ्याच जणांना आवरायची नाही. डबा उघडायची जेवढी घाई तेवढीच घाई तो संपवून खेळायला पळायची असायची. त्यातच भांडणं, मारामाऱ्या आणि कट्टी बट्टी पण! अर्ध्या तासात केवढं काही साधायचं असायचं ना.
या सगळ्या दरम्यान आवडत्या शिक्षकांना नावडणारी गोष्ट अजिबात नाही करायची. म्हणजे अभ्यास करणं आलंच! तशीच चढाओढ लागायची स्वाध्यायाच्या वह्या स्टाफ रूम मध्ये कोण नेऊन ठेवणार यासाठी. Other activities सुद्धा मनापासून करायचो नाही का? स्पोर्ट्स, annual function म्हणजे धमाल. आमच्या शाळेत gathering मध्ये रेकॉर्डेड गाण्यांची परवानगी नव्हती. परफॉर्मेंससाठी गाणी गाण्यापासून वाद्य वाजवण्यापर्यंत सगळं विद्यार्थीच करणार. किती गोष्टी शिकायला मिळाल्या. टीम वर्क चे धडे सहज गिरवले गेले.
असंच कळत नकळत वयाच्या अत्यंत अवघड टप्प्यापर्यंत शाळेचा हात धरून पोहोचतो आपण. ‘पर्सनॅलिटी डेवलपमेंट’ वगैरे शब्द कळायच्या आधीच प्रत्येकाला एक व्यक्तिमत्व, एक ओळख देते शाळा. जिंकण्यातली झिंग अनुभवतानाच gracefully अपयश स्वीकारणे तसंच देशभक्तीपासून ते शिस्त आणि मोठ्यांचा आदर करणे अशा कितीतरी संस्कारांच्या शिदोऱ्या सोबत देते. पुढच्या प्रवासाला निघताना आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करवून घेते.
शाळेचा शेवटचा दिवस हा पहिल्या दिवसाला भारी पडतो. गाई तर दोन्ही दिवशी पाण्यावर येतात! फरक एवढाच की पहिल्या दिवशी ‘शाळेत’ जायचं म्हणून आणि शेवटी ‘शाळेतून’ कायमचं जायचं म्हणून! जसजसा काळ पुढे सरकतो तसतसा शाळा म्हणजे आयुष्यातला एक हळवा कोपरा होत जातो. जागवल्या जातात आठवणी व्हॉटस् अॅप च्या ‘back to school’ सारख्या ग्रुप्स वर. आताही बसले असाल एखाद्या वर्गातल्या तुमचं ‘नाव कोरलेल्या’ हककाच्या बाकावर. हो ना?
कळावे,
आनंदमयी
Sunder, agdi mazya manatla sagla....pan tu lihilas.. .Chaan Sayli
ReplyDeleteThank you so much. Pan mala ithe unknown asa disat ahe. Asa ka? I don't know settings in blogspot
DeleteVery well expressed, liked it
ReplyDeleteThank you. Again... unknown disat ahe.
Deleteसुंदर....एका मातीच्या गोळ्याचे मुर्ती मध्ये रुपांतर होण्यापर्यंत चा प्रवास प्रत्येकाचाच पण व्यक्त करणं छान जमलं आनंदमयी
ReplyDeleteThank you so much 💗
Delete