ये घर बहुत हसीन है

प्रिय सख्यानो,

‘वाढता वाढता वाढे,लॉक डाऊन काही संपेना’ अशी आपली गत झाली आहे नाही का.

कसं वाटतं आहे मग घरात? हेच ते घर बरं ज्यासाठी म्हंटल जातं... घर पाहावं बांधून! ह्याच घरासाठी तर सगळा आटापिटा असतो आपला. चांगलं शिक्षण, नोकरी, प्रवास, भरघोस पगार.. जेणेकरून ईएमआय भरताना हात आखडता नको राहायला. बरं मालकीचच हवं असं नाही, मात्र घर हवंच.  डोक्यावर छप्पर नको का! (खूप लोकं आहेत ज्यांना हेही दुरापास्त!) आपल्याकडे असणाऱ्या छोट्या, मोठ्या, टापटीप अथवा अस्ताव्यस्त कशाही ‘घर’ नामक वास्तूत विसावलो आहोत आपण. किती उबदार, सुरक्षित असं feeling आहे हे! उगाच नाही जीवाची पर्वा न करता लाखोंची घरवापसी होतेय.

बघा न, चार दिवस कुठे फिरून आलो तरी घरी परतलं की जे आपलेपण वाटतं त्याला तोड नाही. कोण असतं तसं पाहिलं तर स्वागताला! तर घर बोलतं आपल्याशी. ऐकलं पाहिजे फक्त. घरात असतो तेव्हा घर गृहीत धरलेलं रहातं. थोडं दूर गेलो की त्याच्या आठवणींनी व्याकूळ व्हायला होतं.

घरं बदलती असली काही कारणांनी तरी त्या त्या घराशी नाळ जोडलेली रहाते. आयुष्याचा तेवढा भाग तिथे व्यतीत केलेला असतो ना. अदृश्य बंध उरतो आपल्यात. मला आठवतं माझ्या पहिल्या घरी नालासोपाऱ्याला, ते सोडल्या नंतर मी पहिल्यांदा गेले तेव्हा दुसरंच कुणी राहत होतं तिथे. जुन्या शेजारिणबाईनी म्हंटल, “जाऊन बघा की तुमचं जुनं घर परत एकदा.” झालं!  जिथे आपली आवडती वस्तु दुसऱ्याच्या हाती पाहूनही जीवावर येतं, तिथे ज्या वास्तूत घर वसवलं तीच परक्याच्या ताब्यात! असं असलं तरी पुन्हा आपलं घर पाहायचा मोह सुद्धा आवरला नाही मनाला! मन घट्ट करून जायचं ठरवलं.... आणि दारातून एक पाऊल आत टाकताच जणू static electricity चा झटका बसला मला. असं वाटलं ओथंबून राहिलेल्या आठवणी दारातच बिलगल्या. आता यात माझ्या ‘मनाचा खेळ’ मोठा मानला तरी त्यातूनही आमचा (माझा आणि घराचा) बंधच अधोरेखित झाला असं मी मानते. अगदी असंच नाही पण थोड्याफार फरकाने तुम्ही ही कधी अनुभवलं असेलच ना हे?

जुन्या घरांना पुन्हा दिलेल्या भेटी नेहमी आठवणीचा फेर धरतात भोवती. त्या घरातल्या आठवणी लहानपणीच्या टिवल्या बावल्या करत असोत किंवा मूटकुळया करून दाटीवाटीने अंथरूणात लोळत असो. मधल्या काळात बदललेल्या लाइफस्टाईल ची आवरणं गळून पडतात. आणि त्यावेळी कदाचित अडचणीच्या असणाऱ्या गोष्टी आता आयुष्यातल्या मोठ्या achievements वाटतात.

सासरी कितीही रमल्या तरी बायका माहेरच्या आठवणीने व्याकूळ होतात म्हणजे तरी काय? माहेरची माणसंच केवळ त्या आठवणींचा भाग नसतात तर त्या घरातल्या कोपऱ्यानकोपऱ्यात जीव गुंतलेला राहतो. वर्षभराने माहेरी गेल्यावर साधा घराचा रंग जरी बदलला असला तरी आत कुठे खट्टू होतं. असं ते घर हो! फार possessive करून टाकतं.

‘साथ साथ’ मूवी मधलं ‘ये तेरा घर ये मेरा घर ..’ गाणं ऐकलं असेल ना. प्रत्येकाची दृष्टी निराळी म्हणजे प्रत्येक घर निराळं. जसं आहे ते माझं आहे म्हणून ‘पहले आ के मांग ले... मेरी नजर! असं हे home sweet home सध्या home safe home झालं आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे ‘कंटाळा आला बुवा घरात बसायचा’ असं न वाटून घेता ‘पुन्हा शतकभरात तरी अशी संधी मिळणे नाही’ असं मानून घराला देऊयात की थोडं घरपण.. आणखी काही दिवस. काय म्हणता?

कळावे,

आनंदमयी


Comments

  1. जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सुंदर कल्पना घराला घर पण देण्याची माणसाला घराची ओढ लागते तशी घरालाही माणसांची ओढ लागत असेलच की मग वेळ मिळाला आहेच तर......Enjoy Home Sweet Home

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट