मन तरंग


प्रिय,

मस्त पावसाला सुरुवात झाली की ‘खमंग भजी आणि वाफाळता चहा’ हा बेत झाला नाही, असं होणारच नाही. हो ना? मात्र घरी कितीही घाट घातला तरी ‘पावसाळी घाटातल्या’, गाडीवरच्या ह्याच बेताची आठवण सतावते. काय कनेक्शन असतं काही गोष्टींमध्ये! सांगून समजत नाही. पण असतं एवढं नक्की.

तसंच कळण्यापलिकडचं काही अधूनमधून डोकावत रहातं. वाहावत घेऊन जातं आपल्याला सोबत. मग ते एखादं गाणं असो की पदार्थ! कुठच्या कुठे कनेक्ट करतं आपल्याला! बरं त्या गोष्टी फार काव्यात्मकच असायला हव्यात असंही नाही.
म्हणजे उदाहरणार्थ, माझं होतं असं काही वेळा, बाजारात फिरताना एखाद्या दुकानासमोरून जाताना तिथल्या अगरबत्तीचा सुगंध नाकाशी दरवळतो आणि क्षणात आजोळच्या वाड्याशी तार जुळते. कुळथाच्या पीठिचा वास म्हणजे चाळीतल्या कुडकर आजींच्या घरातून येणारा चविष्ट सुगंध. गावठी तुपाचा चमचा जिभेवर टेकवताच विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधली शम्मी अंकल कडची डिनर सेटची प्लेट आणि डोसा दिसायला लागतो. या जोडण्या कधी होतात कुणास ठावूक. लहानपणी कधीतरी बसलेले असतात हे सुगंध आणि चवी नाकात.

विक्रोळीला आम्ही राहत असतानाचा काळ म्हणजे माझं वय वर्ष दोन केवळ. तरी पस्तीशीत सुद्धा तेवढ्याच strongly सगळं क्षणात समोर येतं. आहे की नाही गंमत!

गाण्यांचं तर फारच मोठं प्रस्थ या बाबतीत! कितीतरी गाणी वेगवेगळ्या भावनांना connect करतात. प्रत्येकाचं emotional connection असतंच कुठल्या ना कुठल्या गाण्याशी. मग ती प्रेमभावना असो वा विरह यातना किंवा आणखी काही. प्रत्येकाकडे लिस्ट असेल अशा connecting songs ची. काही गाणी personal level ला relate भले होत नसतील पण ती कानावर पडली की सगळा भवताल बदलून जातो. यात गाण्याचे शब्द, गाणाऱ्याचा आवाज, संगीत यावर कडी करतो ‘गाण्याचा भाव’. जो काही वेळा आपल्या मनात नसला तरी जागा होतो.

चित्रपटांचं ही तेच. गारुड करतात मनावर काही movies! अशा अदृश्य, अस्पर्श विश्वाला कनेक्ट करतात...ज्यातला भाव आपल्या वास्तवाशी, कदाचित दूरान्वयानेही जवळीक साधत नसतो. जसा गुलजार चा ‘इजाजत’ आणि त्यातलं ‘मेरा कुछ सामान!’ शब्दातीत असं काही ढवळतं आत मध्ये! अनुभवता येतं फक्त.
बरं यातलं काहीच अशक्य नसतं अनुभवणं, रोज साठी. पदार्थ करता येतात, movies पाहता येतात, गाणी ऐकता येतात, वस्तु विकत आणता येतात. पण मी नाही करत त्या गोष्टी वारंवार. कारण एकच... नेहमी अनुभवून त्यांचं ‘जुळणं’ थांबवायचं नसतं मला. बोथट करावसं नाही वाटत ते feeling. असं किती वेळ टिकतं हे? तर क्षणात जुळतं तसं क्षणात नाहीसंहि होतं. मात्र तेवढ्या काळापुरतं जिवंत करतं सगळं. तुमचंही होतं का असं कधी?

रोजच्या धावपळीत असं काही घडलं की क्षणभर विरंगूळतं मन. कधी उदास करून जातात या गोष्टी. तर कधी प्रेमात पाडतात. कधी अवचित समोर येतात तर कधी आपल्याच आमंत्रणावरून येऊन, घेऊन जातात आपल्यालाही सोबत.
आपण बस तरंगत राहायचं त्या लहरींवर. जुळवत राहायच्या तारा मनाशी आणि refresh होत जायचं दरवेळी.
तोपर्यंत,
कळावे,

आनंदमयी

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय ग .. हे वाचताना माझी तार जुळली.. तुझ्या लहनपणातील रूपातील अवखळ हसण्याशी ... ,कसारा घाटा मधील धुक्याशी .. आणि गाडी थांबवून खाल्लेल्या भज्यांशी... सबन्ध नसलेल्या तारा जुळतच असतात बघ.. खुपच छान लिहिलं आहेस.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. लेख इतका सहज लिहिलाय की वाचताना सगळ्या आठवणी तरळून गेल्या आणि चवी रेंगाळू लागल्या.....कांदा भजी आहाहा.....

    ReplyDelete
  4. Khup sunder tai.....junya goshti dolya samor yeu lagtat...

    ReplyDelete
  5. खूप छान,आठवणीने मन प्रसन्न झाले

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय. म्हणजे हे असं सगळं माझ्या बाबतीतही होत होतं , पण त्यावर असा कुणी लेख लिहील असं वाटलंच नव्हतं.
    मस्तच

    ReplyDelete
  7. लेख वाचून आम्हाला आमची कोकणातील ट्रीप आणी कोस्टल कर्नाटक च्या ट्रीप ची आठवण झाली नारळ चे झाड काही गाणी ऐकली कि तो सागर किनारा
    त्या नारळी च्या बागा सर्व आठवते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट