होतं ना असं कधी कधी

प्रिय सखी,

होतं ना असं कधीकधी,

गर्दीमध्ये नजरेसमोरून जातो एखादा परिचित चेहरा आणि सोबत तरळून जातं विस्मरणात गेलेलं बरंच काही.

शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर ,रोजच्या प्रवासात किंवा कदाचित ऑफिस च्या गप्पांमध्ये मनीच्या गुजगोष्टी जिच्यासोबत वाटून घेतल्या तो तेव्हाचा रोजचाच  चेहरा की हा!

मधली काही वर्ष वाऱ्यासारखी  उडून गेलेली असतात.खूप सारे नवे चेहरे,नव्या ओळखी जवळच्या वाटायला लागलेल्या असतात,जवळच्या झालेल्या असतात. 'आज ' कुणीतरी वेगळं असतं  शेरिंगसाठी .

'आज 'च्या तिला कळलेली मी खरीच असते.पण म्हणून 'काल च्या तिलाही भावलेली मी खोटी नसते. आणि तरीही दोघींसाठी 'मी ' काही वेगळीच उरते . तेवढंच वेगळं असतं माझं नातंसुद्धादोघींशी. तेवढंच प्रामाणिक !

बरं केवळ दोघीच नसतात हं या यादीत. अनेक चेहरे सामील असतात  ...नकळत एकाच वेळी. आज 'काल ' सारखं  काही नसलं आमच्यात तरी जगल्या  क्षणांची देणी मात्र लागतात एकमेकींना.

गुलझार साहेब इजाजत मध्ये म्हणतात ते  'कुछ सामान ' प्रत्येकीकडे देऊन ठेवलेलं आणि सोबतही आणलेलं असतं आपण. या देवघेवीतूनच समृद्ध झालेलं असतं जगणं.

वाटतं ,मागत नाही बसायचं ते काहीच परत. आणि   नको  तो आग्रह काल ने आज 'मध्ये  लुडबुडण्याचा ....कितीही  टेम्पटिंग  वाटलं  तरी! राहू  द्यावं  सगळं  अनाघात !

काही देणी चुकवण्यापेक्षा थकवण्यात जास्त आनंद घ्यायचा . राहायचं दोघींनीही काळाच्या त्याच 'आपल्या ' आवर्तनात .

होतं असं बरेचदा!

- आनंदमयी 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट