आवर रे , सावर रे
प्रिय,
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी पार
पडणारा task म्हणजे साफसफाई आणि सफाई म्हणजे केवळ जाळी जळमटी काढणं नव्हे तर शक्य
तिथला पसारा आवरणे. ज्यात वापरात नसलेल्या गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवणं
अपेक्षित असतं. मात्र प्रत्यक्ष कामाला लागता होतं भलतंच. घर आवरताना रमायला होतं वस्तूंमध्ये.
घर आवरायला घेतलं की काय काय ‘आवरतं घ्यावं’ लागतं नाही! काय नसतं त्यात! कदाचित एखादा संसार उभा राहील एवढ्या वस्तू कुठेकुठे मांडून ठेवलेल्या
असतात.
घर म्हणजे कपाट, किचन ट्रॉली,
माळे, किचकट स्टोरेज वाले कप्पे आणि खण. त्यात असतात असंख्य गोष्टी.
असतं एक घड्याळ, आठवणीतले कपडे शिवाय एक असतं जीर्ण होणारं पत्र, सोबत आठवणीतल्या
पुस्तकातलं पिंपाळपान! कधी असतो स्टोव्ह, तशाच असतात
ताट-वाट्या,चमचे. म्हणजे Modular kitchen मध्ये फिट बसत नाही, म्हणून back seat वर विराजमान झालेला तत्कालीन
संसार! अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि हो, असतातच. ‘होत्या’ किंवा ‘आहेत’ या
गटात नाही मोडत हे सगळं. मात्र ‘मोडीत’ ही नाही निघत काही केल्या.
गरजपूर्ती साठी घेतलेल्या वस्तू, हौसपूर्ती
साठीच्या वस्तूंकडून take over झाल्यावर ‘कपाटबंद’ होतात. घरं बदलली तर सोबत येतात
आणि नव्या वास्तूत जागा करतात. कुणाला देववत नाहीत आणि वापरात घेववत नाहीत. कधीतरी
वापरू म्हणून ठेवल्या जातात काही वस्तू, ज्या कधी आठवतच नाहीत वेळेला नेमक्या कुठे
ठेवल्यात.
यात भर पडत जाते. माझ्या वस्तूंचा संग्रह
करता करता लेकीच्या वस्तू जागा पटकवायला लागतात. तिने केलेली ग्रिटींग्ज, काढलेली
चित्रं आणि बरंच काही. जेवढी माणसं घरात, तेवढ्या त्यांच्या तऱ्हेच्या वस्तूंचा
संचय. नवरोबाच्या संग्रही खिळेसुद्धा मिरवतात!
परत सगळं ‘जागच्या जागी’ रचताना मनात ठरवलं जातं, ‘next time ‘नको ते’ सगळं काढणार बाहेर. उगाच जागा अडते आणि आवरत बसावं लागतं.’ आणि next time ‘नको ते’ सगळं ‘असू देऊ की’ गटात जाऊन बसतं. Nostalgic करण्याचं जबरदस्त सामर्थ्य असतं या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण निव्वळ वस्तू नव्हे माणसं, भावना, आठवणी आणि बरंच काही असतं त्यात. एखादी वस्तू जुनी होते, पण घेतलेली असते नवा संसार थाटताना. काही जपल्या जातात माहेरच्या मायेने. तर काहींना असते मायेच्या माणसाच्या स्पर्शाची ऊब. माळ्यावर अडगळीत पडलेल्या वस्तूशी असू शकतो बंध प्रेमाचा एकेकाळी. आणि याच मोहात अडकत जातो आपण दरवेळी, आपल्याही नकळत.
प्रत्येकाचा पाश वेगळा,
मोहात मात्र पाडतो प्रत्येकाला. हो ना?
काय मग, कधी घेताय आवरायला घर?
कळावे,
घर आवरणं म्हणजे कष्टाबरोबर जुन्या आठवणी बरोबर रमणे
ReplyDeleteNice 1👌
ReplyDeleteखुप छान 👌👌
ReplyDeleteEkdam correct
ReplyDeleteMastach
ReplyDeleteसुंदर...एका वाक्यात गुंतता हृदय हे.......
ReplyDelete