मैत्र
प्रिय,
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
बालपण ते वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जगण्यासाठी, तग धरण्यासाठी जर कुठली भावना हात देत असेल तर ती मैत्री. जगात सर्वसुखी कुणी आहे की नाही माहीत नाही मात्र ‘ज्याला मित्र नाही’ असा विरळाच. किती काय देते मैत्री! लहानपणी घरच्यांचा आदर आणि धाक असल्याने करता न येणाऱ्या चिडणे, ओरडणे, भांडणे, कधी दादागिरी तर कधी झुकते माप घेणे, चीटिंग आणि प्रामाणिकपणा अशा अनेक गोष्टी मित्रांच्या सोबत सहज अनुभवतो आपण. आणि हळूहळू समाजात राहण्याच्या दृष्टीनेही तयार होतो. राहत्या ठिकाणी, शाळेत, कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण म्हणजे ‘सोनेरी क्षणांचे सोबती’ असतात.
शब्दात मांडता मावत नाहीत मैत्रीचे गोडवे. एक किंवा दोनची संख्या मैत्रीच्या बाबतीत थोतांड वाटते मला. कारण मैत्री प्रत्येकाच्या बाबतीत काही वेगळं घेऊन येते. सगळ्यांचीच. शाळेतल्या मैत्रिणी आणि लग्नानंतर झालेला सोसायटी मधला ग्रुप यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आणि तरी दोन्हीकडच्या मैत्रिणींमध्ये रमतोच की आपण. कॉलेज मधला मित्र मैत्रिणींचा घोळका दोन दशकांनी भेटला तर तेव्हा कुठे आपण आधीसारखे उरलेले असतो? आणि आठवतो मात्र जुन्याच एकमेकांना! कामाच्या ठिकाणी सोबत राहून का होईना जुळतातच ना मैत्रीचे बंध! थोडक्यात काय तर जाल तिथे वेगवेगळ्या रूपात भेटतेच मैत्री. आणि भेटलो / नाही भेटलो तरी भाव तसाच उरतो.
Friend in need is friend indeed…. असं लहानपणापासून घोकत आलो असलो तरी, मैत्री ‘संकटकाळी मदतीला धावणारी’ च असली पाहिजे असं नाही. नाही जमली मदत करायला तर मीही समजून घ्यायला हवंच ना...मैत्रीण म्हणून? किंवा ‘कर्णा’सारखी चुकलो तरी पाठीशी घालणारीही नको. परखड बोल लावले आणि बाजू नाही घेतली माझी, म्हणजे ‘माझं काही चुकत आहे’ हे सांगणारी सखी लाभल्याचं समाधान मिळायला हवं की नाही. वयाच्या एका टप्प्या नंतर... भलं बुरं कळायला लागल्यानंतर तर ‘सुसंगतीच सदा घडावी’ असाही मैत्रीसाठीचा हट्ट नकोसा वाटतो मला. निदान आपण स्वतः ‘सुसंगतीच्या’ कसोटीवर खरे उतरत असू तर नक्कीच नाही. कारण समोरचा कधी आपल्यात चांगली सोबत शोधून ‘सुसंगत’ होईल, सांगता येत नाही. अर्थात यासाठी स्वतःवर तेवढा कंट्रोल हवा. (‘सुसंगत’ च्या कसोटीवर टिकून राहण्याइतका.) हे झालं आपल्यातल्या समाजशील प्राण्यासाठी.
व्यक्तिगत स्तरावर तर प्रत्येकाशी असलेलं connection वेगळं! एखाद्याशी कशाबाबतीत tuning जुळेल सांगता येत नाही. काही वेळा वर्षं सरून जातात आणि कधी क्षणात मधले भेद सरतात , सूर जुळतात. एखाद्याशी सगळी secretes सांगण्याइतपत जवळीक असते, तर एखादी गोष्ट exclusively दुसऱ्याच कुणापाशी व्यक्त होता येत असेल. कुणा सखीने ‘माझं ऐकावं’ म्हणून ती मला ‘माझी’ वाटते, तर कुणाला ‘मी तिचं ऐकून घेते’ म्हणून. ‘फन पार्टनर’ आणि ‘सिरियस टॉक’ वाली मैत्रीण एकच असेल असं नाही. प्रत्येकाशी नातं वेगळ्या स्वरूपाचं.
लिहिताना मैत्रीण असा उल्लेख असला तरी मित्र काही याला अपवाद नाहीत. आणि निदान 21 व्या शतकात मुलामुलींची मैत्री हा ‘वेगळा भाव’ आहे असं अधोरेखित करायची ही गरज नाही. समजून घेणारी मैत्रीण एखाद्या मित्राचीही असू शकते तसंच vice versa. तेच मैत्रीच्या वयाच्या बांधनाबाबतही.
शेवटी मैत्री म्हणजे काय, ‘मनाचं मनाशी असलेलं मानाचं नातं’. एखाद्या भेटीत अल्लड करणारं, एका जादूच्या झप्पीत, अव्यक्त कोरड अश्रूनी भिजवून टाकणारं.
आई, वडील, भावंडं आणि नवराबायको सोबतच आता छोटी बच्चे कंपनी ही मित्रत्वाच्या परिघात सामील होत आहेत. तसंच मैत्री नात्यांच्या चौकटीत येऊन ‘फॅमिली फ्रेंडस’ ही संकल्पना कुटुंब मोठं करत आहे. सोशल मीडिया च्या सोबतीने दूरस्थ मैत्री जवळीक साधत आहे.
त्याच सोशल मिडियाचा आधार घेऊन आज घरबसल्या, वेगवेगळ्या स्तरावर मैत्र जुळलेल्या सर्वांनाच पुन्हा एकदा happy friendship day! सगळ्यांच्या आयुष्यात मैत्रीच्या रेशीमगाठी जुळत राहोत ही तुमच्यासाठी आणि त्यातली एखादी गाठ माझ्या नावाची ही असो ही माझ्यासाठी शुभकामना.
कळावे.
आनंदमयी
सुंदर लेख.....सतत कर्णा सारखी सुदाम्या सारखी किंवा तत्सम मैत्री का असावी...ही संकल्पनाच खूप भावली मला...
ReplyDeleteअप्रतिम लिहीतेस ग. आमच्या मनातल्या भावना तू कागदावर उतरवतेस . तेही अगदी सहज , सुंदर भाषेत .
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteKhup khup sundar.. Ek ek vakya motyasarkhe sundar aahe!! Mazyasathi bestest friendhip gift aahe he, mazya sakhikadun. Aani online vachun samadhan nahi hot. Mhanun chan print ghenar yachi.. Sarkhe sarkhe, punha punha , patkan kadhun vachnyasathi!! Patrasarkhe!
ReplyDelete