सोय.. सवय.. संयम

 प्रिय,

खूप वर्षांनी एका मैत्रिणीची पुन्हा भेट झाली... अर्थात virtual भेट. तिने जुना ग्रुप फोटो पोस्ट केला, त्याचवेळी ‘घने बादल के कारण’ network issue झाला. तो फोटो download होईपर्यंत जणू अस्वस्थ च वाटायला लागलं. कधी एकदाचा download होतो असं झालं. त्यावेळी उत्सुकतेपेक्षा download का होत नाही याची घाई जास्त होती. आणि अचानक क्लिक झालं, केवळ एका इमेज बद्दल नाही हे. अपेक्षित असलेला reply येईपर्यंत चारदा मोबाइल चेक केला जातोय. तेवढ्या वेळेपूरतं सगळं थांबतं जणू. कधी काळी ख्याली खुशाली कळवायला, पत्र लिहून उत्तराची महिनोमहिने वाट पाहणारी मी, क्षणाचाही विलंब नको म्हणते आहे. सवयी बदलून गेल्या सगळ्या. नव्या अंगवळणी पडल्या. असं फक्त माझंच नसेल ना झालं?

लहानपणी टीव्ही वरच्या इन मीन दोन चॅनेल्स पैकी दुसरं पाहायचं झालं किंवा आवाज कमी जास्त करायचा म्हंटलं की उठून टीव्हीची बटणं फिरवावी लागायची. त्यातही काही आवडीचं नसेल तर ते लागेपर्यंत वाट पाहायची! आता? रिमोट! आवडीचं काही नसेल तर शेकडो पर्याय एक क्लिक वर. रिमोटपण केवळ टीव्ही साठीच नाही बरं... फॅन, लाइट. सगळं बसल्या जागी operate करायचं. गाडीला किक मारून ती सुरू करण्यात वेळ घालवण्यापेक्षा self start वापरणारे आपण, गॅस पेटवताना लायटर च्या ‘पहिल्या खटक्यातच तो पेटला पाहिजे’ यासाठी आग्रही असतो काही वेळा. मोबाइल वर Video buffer होणं म्हणजे service provider च्या पापाच्या खात्यात भर जणू. एवढंच काय, आपला तर साबण पण फास्ट झाला. (बंटी चा साबण slow आहे ना!)

गेल्या केवळ काही वर्षांत कुठून कुठपर्यंत पोहोचलो नाही सगळे? सोयीसाठीच आहेत सगळ्या गोष्टी. फक्त सोईचं म्हणता म्हणता संयम तेवढा कमी होत गेला बहुधा. ‘सवयीने संयम’ अंगी बाणवता येतो. आताशा सवयीच अशा बाणवल्या गेल्या की ‘वाट पाहायची’ जमेना झालं.
वाट पाहायची! तिशी पुढच्या सगळ्यांनी सुरुवात ‘वाट पाहायला लावणाऱ्या दिवसांनी’ केली असली, तरी पुन्हा तीच करामत जमेनाशी होत आहे आपल्यालाही. मग technology चं बोट धरूनच जगात आलेल्या छोटयांकडून तरी कशी अपेक्षा धरावी नाही का? ते तर online test submit करतात न करतात, तोच result समोर असतो त्यांच्या.
पळता तर येणार नाहीच या सगळ्यापासून. गरज ही नाही तशी. कारण हीच काळाची गरज झाली आहे. आहे त्यातूनच वेळ चोरायला शिकायचं आहे. Video buffer होताना चार दीर्घ श्वास घेता येतात का पहाते. रोपांना पाणी घालताना त्याचं जिरणं पहावं म्हणते. ‘तूप खाऊन रूप येणार नाही’ तसं आज केलं आणि उद्या संयमी झाले असं होणार नाही हे माहीत आहे मला. करून पाहायला काय हरकत आहे!
तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तर कळवाल हं.

तोपर्यंत,
कळावे.
आनंदमयी

Comments

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट