गोष्ट सांगते ऐका

 प्रिय,


गोष्ट सांगते ऐका. एक होते चिमणराव आणि एक होत्या चिमणाबाई. चिमणराव आणि चिमणा बाई यांनी काडी काडी जमवून घरटं बांधलं. दरवेळी घरट्याचं काम झालं, की काही न काही संकट यायचं आणि पुन्हा पहिल्याने सुरुवात करावी लागायची. चिकाटीने जगत आलेल्या दोघांना हार मानणं कबूल नव्हतं. बाळकडुच तसं मिळालेलं. मोठ्या कष्टाने एकदाचं बांधलेलं घरटं काही दिवस टिकल्यावर चिमणी म्हणाली, ‘पिल्लाची सोय झाली!’

काही दिवसातच पिल्लं जन्माला आली आणि चिमणा चिमणी आनंदून गेले. मात्र संसारात रममाण होण्याऐवजी आणखीनच चिंतेत पडले. दोघांच्या संवादात नेहमीच ‘आपण उपसलेल्या कष्टाची झळ आपल्या पिल्लांना नको बसायला’ याचा विचार असायचा. मग काय तर, त्यांचा दिनक्रम ठरूनच गेला. चिमणराव जाणार जेवणा खाण्याची सोय करायला आणि चिमणी पिल्लं सांभाळत घरट्यात! पिल्लं आपली मजेत एकदम. घरट्यात राहून सगळंच तर मिळत होतं. कुणा अवांछिताने त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला तरी चिमणी होतीच रक्षण करायला!

दिवस मस्त जात होते. चिमणराव आणि चिमणी पण मनातून खुश होते. त्यांच्या पिल्लांना ‘कसलीच झळ पोहोचू न देण्याचं’ त्यांचं स्वप्न जे पूर्ण होत होतं! चिमणीला कधी वाटायचं थोडी भरारी आपणही मारून यावी. पंख मोकळे करावे. मग तीच पुन्हा पिल्लांना पाहून घरट्यात विसावायची. चिमण्याचीही ओढाताण होतच होती की एकट्याने सगळा भार ओढताना. पण आपणहून घेतलेली जबाबदारी, सांगतो कुणाला!

आणि एके दिवशी दोघेही थकतात. पार थकून जातात. पिल्लांना म्हणतात, ‘आता काही झेपत नाही आम्हाला सगळंच रेटून न्यायला. तुम्ही तुमचं पहा काही जमतं का.’

पिल्लं बिचारी! मोठी झाली तरी पिल्लंच राहिलेली. एकाने आधीच पंख झटकले. ‘मला आयुष्य असंच तर दिसलं पहिल्यापासून. घरट्यात उबदार, निवांत रहायचं, आयुष्य बेफिकिरीत जगायचं. आता नाही जमायचं मला नव्याने काही करायला.’ सगळी भिस्त दुसऱ्या पिल्लावर! हे ही बिचारंच की! पण पर्याय काही नसल्याने करतो म्हणालं प्रयत्न! बाहेर पडता घरट्याच्या, पहिला धडा तर उडण्यासाठीच घ्यावा लागेल त्याला.

तर ही गोष्ट चिमण्याची. उडत, धडपडत, चुकतमाकत जमवेल ते पोटाची खळगी भरायला. natural instinct च्या बळावर आयुष्य जिंकण्याला बराच scope आहे म्हणायचा त्याला. कारण natural instinct अजून जागा असणार पक्ष्यांचा तरी.

ही गोष्ट माणसांची असती तर? की माणसांनी जगायला सुरुवात केलीच आहे चिमणा चिमणीच्या भूमिका? घर, गाडी, पैसा, शब्द उच्चारायचा अवकाश की घराघरातले जिन हजर! नकारघंटा ऐकू येणं तर दूरच. मग तो पचवण्याची क्षमता कशी निर्माण होणार!

अगदीच काबाडकष्ट नकोत, पण निदान आपल्या जगण्यातला struggle तोंडओळखीचा हवा मुलांच्या. सगळं नाकारायचं असं नाही, मात्र कुठेतरी आपणच संयम बाळगून हात आखडता घ्यायला हवा कधीकधी. त्यात कमीपणा वाटून घेण्याची गल्लत होते खरी. ती होऊ न देणं हीच कसोटी.

अगणित आकर्षणं, मोहाचे पाश तोडताना जिथे आपलीही परीक्षा होते, तिथे आपल्या पिल्लांना केवढ्या ट्रेनिंग ची गरज असणार याचा विचार व्हायला हवा.
आयुष्य जगण्यासाठी केवळ ‘पोट भरणे’ नाही तर ‘जगण्याचा पोत सुधारणे’ हाही मापदंड विचारात घेता, थोडं थोडं, जमेल तसं आकाश आपल्याही पिल्लांना मोकळं करून देता येतं का पाहू. काय म्हणता?


कळावे,

आनंदमयी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट