सीमोल्लंघन
प्रिय,
घटस्थापना होऊन नवरात्र संपले सुद्धा. गरबे काही घुमले नाहीत यंदा कुठे मात्र, दरवर्षी प्रमाणे सोशल मीडिया वर स्त्री शक्तीचे आणि मागोमाग ‘केवळ नऊ दिवसच नको तर उरलेले 356 दिवस पण बायकांना कमी लेखू नका’ असे मेसेजेस सुद्धा आलेच. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी ठीक. बायकांचं काय मात्र?
माझ्या ओळखीत काही मैत्रिणी अशा आहेत ज्यांना बाई म्हणून जन्माला आल्याची खंत वाटते. तर काहींना ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत सतत अलका कुबल च्या फिल्मी भूमिकेत (प्रत्यक्षात त्या ही तशा नाहीत हो!) घुसून बसावं वाटतं. कुणाला मन मारत जगायचा मक्ता आपल्याच पदरी का असा प्रश्न, तर कुणाची पाळी बायकांच्याच माथी का मारली यासाठी थेट देवापाशी चिडचिड! या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरुषांनीच केवळ respect ठेवून कसं चालेल नाही का? प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ‘आपणही’ आपला मान राखायला पाहिजे. 365 दिवस!!!
आपणच फ्रेम तयार करतो बाई म्हणून जगण्याची. काही ऐकीव आणि काही पाहिलेल्या चौकटींवरून. कुणा सखीला सकाळचा पहिला चहा निवांतपणे घ्यायला आवडतो. पण उठल्यासरशी ती सगळ्यांच्या दीमतीला हजर होणार आणि दुपारहून चुकचुकणार की ‘अरेच्च्या! निवांत सोडाच पण चहा घेतलाच नाही आपण.’ आणि यात काही वेळा proud वाली complaint असते. कुणा सखीचा नवरा ‘तिला आवडतो’ म्हणून मोगऱ्याचा गजरा आणून देतो आणि घरातच तर आहोत आपण म्हणून ‘कामात गुंतून’ तो माळायचा राहूनच जातो. हाती उरतं कोमेजणं. इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानणाऱ्या आपल्यासाठी त्या कोशातून बाहेर पडणं हे ही सीमोल्लंघनच म्हणायचं.
हळूहळू चित्र बदलत असलं तरी, कधी कामानिमित बाहेर पडल्यावर tempting वाटलं म्हणून एकटीने जाऊन पाणीपुरी खाताना, पाणीपुरी वाला पण असं पाहतो जणू काय ते adventure! मग एकटीने थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहणं तर... अबब! पुरुषांच्या खांद्याला खांदा जुळवून बाई बाहेरचं आणि घरातलंही जग सांभाळते आहे. तरी तिचं स्वतःचं अवकाश स्वीकारण्यासाठीही तिला तयार व्हावं लागणार आहे.
स्वतःवर प्रेम करायला हवं. बाईपणाचे काही plus points enjoy करायला पाहिजेत. पुरुषांप्रमाणे नको वाटलं आणि नाही झेपलं तरी ‘ब्रेड विनर’ असण्याची सक्ती नाही हेही काही क्षणी सुस्कारा सोडण्याइतकं महत्वाचं असू शकतं, हे लॉक डाऊन सारख्या situation मध्ये का होईना मान्य करायला लागेल. सक्ती नसणं आणि अपरिहार्य असल्याने कर्तेपणा घ्यावा लागणं, यात फरक नक्कीच आहे नाही का! त्याचवेळी एकेकाळी पुरुषप्रधान असलेलं असं कोणतंही क्षेत्र बायकांसाठी आता वर्ज्य नाही हेही खरंच. एकवेळ पुरुषांना माघार घ्यावी लागते काही क्षेत्रांच्या बाबतीत.
रडून मोकळं होण्याची आणि प्रसंगी कमकुवत असल्याचं कबूल करण्याचीही मुभा हेच बाईपण देतं, जी पुरुष मनाला अजूनही म्हणावी तशी नाही मिळालेली आणि पडत्या काळात खंबीरपणे उभं राहण्याचं सामर्थ्य सुद्धा बाईपणाची देणगी. भलेभले कोसळतात आणि माघारी बाई सगळं पेलून नेते, अशीही उदहारणं दिसतात आपल्याला.
स्त्री पुरुष समानता तर खूप वेगळा मुद्दा झाला. समोरची बाजू जाणायची तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’! मग आपल्या पदरी पडलेल्याचा पुरेपूर उपभोग का नाही घ्यायचा आपण?
चला तर मग, आपणच आपली कदर करुयात रोज. Without guilt स्वतःची पण मर्जी राखूयात रोज. असंही सीमोल्लंघन करुयात रोज!
जमेल ना?
कळावे,
आनंदमयी
अगदी खरं . बाईचा जन्म दिला म्हणुन तुझ्या मावशीला पण खन्त वाटत असते बरका. वडाला फेऱ्या मारताना सात जन्माची साथ असली तरी भुमिकेत अदलाबदल व्हावी हेच मागणं मागतात त्या. पण स्त्री म्हणून जगताना स्वतः तल्या स्व ला नीटपणे न ओळखल्याने स्वतःवरच चिडचिड होत असते. बाईचा जन्मच नको असं त्यांना नेहमी वाटत असत. बरच काही लिहायच आहे पण सध्या पुरे करतो. तू खुपच छान लिहिलं आहेस. आणि तू स्वतः तल्या स्व ला तू कधीही विसरली नाहीस.
ReplyDeleteYes. Thank you so much Kaka
DeleteKaruya nakki prayatn
ReplyDeleteछान विषय, विचार करायला लावणारा लेख
ReplyDeleteखूप सुंदर आणि विचार करायला लावणारा लेख.असेही सीमोल्लंघन नक्की करायला हवे तरच स्त्रीया स्वतःला न्याय देऊ शकतील
ReplyDelete