इस पल में जीना यार

 प्रिय,


Unlock मुळे सगळं परत नियमितपणे सुरू होण्याच्या दिशेला निघालो आपण. सुट्टीचा कितीही कंटाळा आला असला तरी ती ‘संपतेय’ म्हंटल्यावर ‘कसे पटकन गेले नाही का एवढे महीने’ असंही होत असणार. काय काय करायचं ठरवलं होतं, त्यातलं खरंच किती काय केलं, याचा हिशोब होणार आणि कदाचित उरलेले मोजके ‘घरातले’ दिवस पुरणार नाहीत इतकी मोठी लिस्ट तयार होईल. ‘अरेच्या! अमुक पुस्तक तर राहिलंच वाचायचं.’ किंवा ‘करू करू म्हणता योगाभ्यास सुरू करण्याचा योग काही जुळलाच नाही आपला’ असंही झालं असेल. एवढंच कशाला, 24 तास सोबत राहून सुद्धा ‘आता परत काही असा chance नाही’ याचं वाईट ही वाटत असणार.
गंमतच आहे नाही आपली! जेव्हा जे मिळतं तेव्हा ते पूर्ण मनाने enjoy करत नाही, हातातून सुटायला लागल्यावर मात्र आठवत बसतो. मग वेळ असो वा माणसं!
नारदाची गोष्ट माहीत असेल न, काठोकाठ भरलेल्या घड्यातून ‘थेंबभरही पाणी न सांडता’ प्रदक्षिणा घालण्याच्या नादात, विष्णुदेवाचं विस्मरण झालेले नारदमुनी? ‘अखंड नामस्मरणात ही विस्मरण’! तसंच काहीसं होतं आपलंही. ‘जगण्याच्या नादात जगण्याचंच विस्मरण!’
बरं वाचतो हं आपण खूप काही सोशल मीडिया वर. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, दोबाराच काय तिबारा पाहिलेला असतो. तरी रमत नाही ‘आहोत तिथे’. एक तर मागे जातो आणि आठवाचे अश्रु गाळतो किंवा भविष्यात डोकावायचा प्रयत्न करत राहतो. आहोत तिथे राहून, आहे तो क्षण, जसा असेल तसा घ्यायला विसरतो.
आनंद झाला की जशी energy मिळते, तसंच रागात पण संचारतं ना अंगात? म्हणजे energy मिळतेच, मग वाया कशाला घालवायची नाकारून! घ्यायचं रागावून. व्यक्त झालं की निचरा होऊन जाईलच. अर्थात निगेटिव भावनांना वळण लावावं लागतं. भरकटण्याइतपत स्वातंत्र्य नाही देता येत त्यांना. मात्र बंदिस्त ठेवल्या की उफाळून येतात. त्यापरीस रडून, चिडून घेतलं की दोघेही मोकळे... भावना अन आपण.
तिथल्या तिथे त्या त्या क्षणाचं देणं चुकतं करत जावं आणि पुढच्या साठी जागा रिकामी करावी. म्हणजे कसं येणारा प्रत्येक नवा क्षण काठोकाठ जगायला मोकळे. काय म्हणता?
कळावे,
आनंदमयी

Comments

  1. तिथल्या तिथे त्या त्या क्षणाचं देणं चुकतं करत जावं.... ही कल्पनाच आवडली मला देणं चुकतं केलं की पुढे मनावर कसलं ओझं रहात नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट