ओळख
प्रिय,
दिवाळी मध्ये सगळ्यांना इतक्या दिवसांच्या बंदीवासातून सुटका मिळाली. नियम शिथिल होताच सगळ्यांनी गावी (विशेषतः माहेरी) धूम ठोकली; येताना सगळं ‘वसूल’ करूनच परत येण्याचा चंग बांधून! माझं माहेर इथेच असलं तरी इतर हक्काची माहेरची माणसं नाशिक मध्ये विखुरलेली. एका सुट्टीत मीही नवरोबाला माहेरच्या वारीला घेऊन गेले. अनेकांचे राहते पत्ते इतक्या वर्षात बदलले. तिथल्या सोबत आणखी एका स्पेशल ठिकाणी गेले अहोंसोबत... लहानपणी जिथे सुट्ट्या घालवल्या त्या ‘आजोळी’. आणि ज्या उत्साहात सगळी वर्णनं केली ‘आमच्या वाड्याची’ तेवढीच चकित झाले वाडा पाहून. इकडच्या स्वारीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह 🧐आणि माझ्या हतबलता 😔! वर्णनातलं काहीच नाही म्हणून त्यांच्या आणि आठवणीतलं तसंच्या तसं दाखवता येणार नाही म्हणून माझ्या!
कुठलाच बदल काही एक रात्रीतला नसतो. अगदी आपण राहतो तिथल्या गल्लीबोळा, रस्ते सुद्धा तर विस्तारत जातात पाहतापाहता. माझ्या लहानपणीच्या घरापासून शाळेचा रस्ता ओढे, गवत, मातीने भरलेला होता एकेकाळी; जिथे आता मोठमोठे रस्ते आणि टॉवर्स उभे आहेत. नवख्या माणसाला पटवतच राहतो आपण, “असं अजिबात नव्हतं हो इथे!” जुन्या रेल्वे स्टेशन्सचे कसे फोटो पाहतो आपण सोशल मीडियावर? जुनी मुंबई, जुनं ठाणं, जुनं कल्याण….तसे शहरातल्या गल्लीबोळयांचेही फोटो काढून ठेवावे वाटतात मला. कारण नंतर आठवता आठवत नाही मूळ कसं होतं.
जे रस्त्यांचं तेच माणसांचं! ज्यांना लहानपणापासून पाहत आलो अशांच्या ओळखीही पाहतापाहता बदलत जातात. विस्तारतात. आपल्याही! आयुष्यात नवीन येणाऱ्याला नाही का कधी पटवून द्यायचा प्रयत्न करतो, “असा/अशी अजिबात नव्हते/नव्हतो हो मी!” आपल्याच आठवणीतले आपण जुने होत राहतो; तरी नव्या लोकांना त्याची झलक माहीत नसल्याची खंत जाणवते काही वेळा. जुन्या फोटोतून फार तर माणसांचा अंदाज तेवढा बांधता येतो, अर्थात दिसण्यातला केवळ!
जुनी वळणं नजरेआड झाल्यावर नवे रस्ते कसे आपलेसे होतात, तसंच आपलंही वळण अंगवळणी पडतं नव्या-जुन्या सगळ्यांच्या. ‘परिवर्तनमेव स्थिरमस्ति’, मात्र जुनं काही जपून, नवं काही करता आलं तर? म्हणजे जुना वाडा जमीनदोस्त करून नवाकोरा बंगला बांधण्यापेक्षा modify केल्यासारखं? आपण तेच, थोडे काळानुरूप बदललेले मात्र मूळ न हरवलेले. थोडे नव्या नात्यांसाठी जुने, थोडे जुन्या लोकांसाठी नवे! बहारच नाही का?
कळावे,
आनंदमयी
Awsome
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteWow.. Childhood memories refreshed..
ReplyDeletemast
ReplyDeleteखरंच.... जुन्या नव्याचं fusion करून पहायला काय हरकत आहे
ReplyDeletethank you everyone
ReplyDelete