विस्मरण
प्रिय,
माझ्या सोबत हमखास घडणारा प्रसंग म्हणजे आईने एखादी घटना सांगावी आणि मला ती थोडीही आठवू नये आणि मग त्यावर ‘अशी कशी विसरते ही’ वाली reaction! माझी लेक तर मला ‘विसरुळू’ (विसराळू शब्द बोलता येत नसल्यापासून) म्हणते. कुणास ठावूक कसे, अख्खे प्रसंगच्या प्रसंग delete होतात आठवणीतून. कुणी जुना किस्सा सांगून टाळी मागावी आणि मी ब्लॅंक! कालपर्यंत लक्षात होतं मात्र आज नेमकं wish करायचं राहून गेलं, म्हणून belated wishes हे ही दुर्मिळ नाही. कुठल्याशा दुकानात एखादी व्यक्ती अचानक ‘हॅलो’ करते आणि ओळखलं की नाही असं विचारते. तिला सोबत घालवलेले अनेक प्रसंग, कॉमन फ्रेंड्स असं सगळं आठवत असतं. आठवत नसतं ते मला! विस्मरण! आणखी काय!
एवढंच काय, कुणाला कधी ‘लक्षात ठेवेन’ वाल्या (स्वतःच्या मनातच दिलेल्या) धमक्याही लक्षात राहत नाहीत. (म्हणजे नंतर आठवतात हो... त्याच व्यक्ती सोबत खळाळून हसून झाल्यावर.) मग चहाचं आधण ठेवल्याचं विसरले तर काय मोठं! मला वाटतं, गझनी मधल्या आमीरच्या नंतर विसरण्यात माझाच नंबर लागत असावा.
आपलं बुवा विसरत विसरत का होईना मजेत चाललं आहे. मात्र सगळं ‘लख्ख आठवतं’ या गटातल्या लोकांचं तसं कौतुक वाटतं मला. आठवणीतले प्रसंग जिवंतपणे उभे राहतात मनात. आणि दरवेळी सगळेच प्रसंग पेलून नेणं सोपं खचितच नाही! कारण स्मरणरंजन सुद्धा दुधारी तलवारीसारखं! कधी गुदगुल्या आणि हसू तर कधी अश्रू आणि अगतिकता! जाणूनबुजून काही आठवणी मागे सारणं तसं खूप कठीण! आठवणींवर पडदा टाकता आला तरी छोटीशी झुळुकही सगळं समोर आणून ठेवते. आपल्याला ‘हवं की नको’ हा प्रश्नच नसतो अशावेळी.
आता जगात नसणाऱ्या, मात्र एकेकाळी आयुष्याचा भाग असणाऱ्या कुणाची आठवण येता, ‘आत्ता नाही आहे’ याचं स्मरण त्रासदायक. आणि म्हणून सोबत येणाऱ्या आठवणींनाही दु:खाची किनार लागते. ‘आत्ता नाही’ हे विसरून आठवता आलं, तर त्याच्या आठवणीनंही ‘इथंच असल्याचा’ भास किती ऊबदार असू शकेल! म्हणून मला स्मरणाइतकंच विस्मरणही वरदान वाटतं.
विस्मरणही व्हायला हवं. केवळ प्रसंगांचं नाही, काही विखारी शब्द, भावना, कटाक्षांचं सुद्धा. ‘जरा विसावू या वळणावर’ म्हणताना ‘विसरून जावे सारे क्षणभर’ अशी आठवण करून द्यावी वाटते यातही बरंच आलं.
थोडक्यात काय, शंखपुष्पी अभ्यासपूरती बरी म्हणायची!
कळावे,
आनंदमयी
Chaan zalay likhan.... Sahmat aahe aga me
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteविस्मरण हे एक वरदान आहे कारण कटु आठवणी खूप त्रास देतात त्यापेक्षा अशा गोष्टी विसरून गेलो की life easy होतं....
ReplyDeletethank you
ReplyDelete