अश्रूंची झाली...

 

प्रिय,
लहानपणापासून पपांच्या तोंडून ऐकलेलं एक गाणं माझं खास आवडतं, ‘रोते रोते हसना सीखो, हसते हसते रोंना’. खरंच जन्माला आल्यापासून ‘जिवंतपणाचा पुरावा’ म्हणून रडणं आयुष्याचा भाग होतो. भले रडू कुणालाच आवडत नाही. मात्र दु:खाच्या, वेदनेच्या, कोलमडून पडण्याच्या प्रसंगात रडण्याचा खरंतर आधारच होतो व्यक्त व्हायला. जेव्हा काहीच करता येत नाही अशी अगतिक परिस्थिती उद्भवते तेव्हाही अश्रू सोबत करतात. परिस्थितीच्या माऱ्याने, अत्यंत वाईट अनुभवांतून ‘रडणं आटलेली’ माणसं पाहिली की वेळप्रसंगी रडता येणं blessing वाटायला लागतं.

रडणं emotional असण्याशी जोडलं गेलं की माणसं पहिला प्रयत्न करतात त्यापासून स्वतःला तोडून टाकायचा. (कदाचित कमकुवतपणाचं लक्षण वाटत असावं म्हणून) मात्र ते केवळ भावनाप्रधान (EMOTIONAL) नसून संवेदनशील (SENSITIVE) असण्याचं ही प्रतिक आहे. पुरुषांना तर रडणे वर्ज्यच जणू. हळवेपणा not allowed!

रडण्याला दुःखाची किनार इतकी परफेक्ट बसली आहे वर्षानुवर्ष, की इतर शेकडो प्रसंगी (वाईट सोडून) सुद्धा व्यक्त होण्यासाठी अश्रू तत्पर असू शकतात हे ध्यानात घेत नाही आपण.

एखाद्या नीरव संध्याकाळी, धुपारतीच्या मंद सुवासिक दरवळात, आर्त साद घालणारी प्रार्थना कानी पडता, नतमस्तक होताना डोळ्याच्या काठावर पाणी तरळतं. बरं त्यासाठी मनाने फार धार्मिकच असायला हवं असं नसत.

मी आणि माझी एक मैत्रीण राष्ट्रगीत सुरू झालं की जवळजवळ रडतोच. मग ते सिनेमा हॉल मध्ये चित्रपट सुरू होण्याआधी लागलेलं असलं तरी! त्यात अभिमानच इतका ओतप्रोत भरलेला असतो की ऊर भरून येतो आणि सोबत डोळेही.

‘दार्जिलिंगला गेल्यावर सूर्योदय पाहणे must’ असं ऐकून (प्रचंड प्रिय झोप मोडून ) मध्यरात्री उठून सूर्योदय पाहायला गेलो. आणि स्वतःच्याही नकळत, ‘या ची देही या ची डोळा’ निसर्गसोहळा पाहताना गंगायमुनेच्या धारा! Speechless!

दिवाळी पहाट आणि मैफिल बाबूजींच्या गाण्यांची! एक से बढकर एक गाण्यांची सुरेल आतिषबाजी. फिर क्या, एकेका गाण्यावर टाळ्या, शहारे आणि डोळ्यात पाणी! अप्रतिम काही ऐकलं, पाहिलं, अनुभवलं की दाद देण्यासाठी अश्रू हजर! मनापासून खळाळून हसलं तरी डोळ्यात पाणी हजर!

लेकीच्या स्टेज परफॉर्मेंस वर डबडबणारे डोळे, खूप गंभीर आजारावर मात करून आपलं माणूस घरी परतलं की भरून येणारे डोळे, विठू नामाच्या गजरात पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याचे ‘विठ्ठल दर्शनाने’ भिजणारे डोळे! त्या त्या वेळी डोळे गाळतात तर अश्रूच, भाव तेवढा दरवेळचा निरनिराळा.

त्यामुळे “पुष्पा, I hate tears!” हे चित्रपटात राजेश खन्ना च्या तोंडी कितीही मस्त वाटत असलं तरी “I तो बाबा love tears!”
तुम्ही काय म्हणता?

तोपर्यंत,

कळावे.
आनंदमयी

Comments

  1. मस्त लेख..... हसणं दोन्ही भावना व्यक्त करत नाही पण अश्रू आनंद आणि दुःख दोन्ही व्यक्त करतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट