बोलते मराठी

 प्रिय,

‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं म्हणताना; तेवढंच एक वाक्य नसतं ते. त्यामागे आणखी अनेक गोष्टी असतात ज्या सांगता किंवा मांडताना शब्द अपुरे पडतात. आज माझंही तसंच होत आहे, मराठी भाषेवरच्या प्रेमाबद्दल काहीही म्हणताना! सहसा जन्मजात मिळालेल्या देणग्यांवर मला फार गर्व नसतो. मात्र ‘लाभले मज भाग्य बोलते मराठी’ असं म्हणताना अभिमानाने ऊर भरून येतो. कारण मला मराठी भाषिक असल्याचा खरोखरीच गर्व आहे.

विद्यार्थीदशेपासून शिक्षिकेच्या भूमिकेपर्यंत (दरम्यान कॉर्पोरेट सोडता) सगळा प्रवास मराठी माध्यमातून झाल्याने तसंच मला लाभलेल्या शिक्षिका आणि मित्रमंडळ यांच्यामुळे; शिवाय आईवडिलांकडून वाचनाचा वारसा मिळाल्याने माझी मराठी भाषेवर असलेली पकड जरा बरी झाली. आणि मग मला नादच लागला मराठीचा असं म्हंटलं तरी चालेल. बोलताना एकेका शब्दाचा उच्चार, लय, भाषेचा लहेजा हे सगळं खुळावणारं आणि त्यावर प्रभुत्व मिळालं की भाषा आणि संवाद खुलवणारं!

भाषा शिकणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं मला वाटतं, त्यातून ती मराठी सारखी समृद्ध भाषा असल्यास नक्कीच तेवढा वेळ द्यावा लागणार. मी ‘जास्त’ या शब्दाचा उच्चार कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला अचूक करायला शिकले. तर त्याच दरम्यान कधी साडी ‘घालत नाहीत तर नेसतात’ हा कायमस्वरूपी बदल केला बोलताना. पानी वरून पाणी वर आले त्यावरून अजूनही हसतो आम्ही घरी. होतातच चुका बोलताना अनेक. अजूनही... मात्र सुधारण्याची गरज वाटली पाहिजे.

कदाचित सामान्यपेक्षा थोडं कठीण मराठी रोजच्या वापरात बोलल्याने काही वेळा ‘किती जड बोलते’ असंही वाचलं आहे मी कित्येक चेहऱ्यांवर! कधी ‘वापरलेल्या शब्दाचा संदर्भच नाही लागला; तर कधी शब्दच पहिल्यांदा ऐकला तुझ्याकडून’ असंही झालं. त्या त्या वेळी मराठी वरचं प्रेम आणि तिच्या भविष्यातल्या अस्तित्वाबद्दलची काळजी माझ्या चेहऱ्यावर न येऊ देण्याची काळजी घेतली आहे मी ही. कारण, भाषेच्या प्रेमात असणाऱ्यांना थोडं वेड्यातच काढलं जातं हा पूर्वानुभव.

अनुभवकथन याकरता की, आजच्या दिवशी ‘मराठी भाषेचा (बोली किंवा प्रमाण भाषेचा) वापर करा’ असं आवाहन दरवर्षी केलं जातं. मात्र बाकी वर्षभर भाषा शिका, चुकत असेल तर सुधार करा, वापरा, तिच्यातली मजा अनुभवा आणि तिचा आदर करा हे ही तितकंच महत्वाचं.

‘मराठी भाषा दिनी’ ‘आनंदमयी’ने पंचविशी गाठली! संवाद रूपाने सुरू झालेला प्रवास सोपा व्हावा म्हणून ‘वाघिणीच्या दुधाची’ सोबत इतर सर्व लेखांत घेतली. आज जरा जड वाटलं असेल तर क्षमस्व! आजचा दिवस मराठीचा!

कळावे,
आनंदमयी

Comments

  1. आनंदमयी च्या रौप्यमहोत्सवी लेखा निमित्त हार्दिक शुभेच्छा , ही वाटचाल अशीच निरंतर चालू राहू दे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. माय मराठी बद्दलचे प्रेम असेच अक्षय रहावे आणि आनंदमयीने असेच शतकोत्तर महोत्सव साजरे करावेत ह्याच शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट