झोपी गेलेला ...
प्रिय,
नुकताच म्हणे ‘जागतिक निद्रा दिवस’ झाला. काय
कमाल आहे नाही हे दिवस, I mean, days
ठरवणाऱ्यांची! कसे शोधून काढतात मर्मस्थानं लोकांची! झोप हा माझ्या
सारख्या ‘सूर्यवंशी’साठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. शाळा, कॉलेजात असताना झोप आवरणं
महाकठीण वाटायचं मला. अजूनही झोप पूर्ण नाही झाली की अपचन होतं. आणि पुढचा सगळा
दिवस चिडचिड!
मोठं होताहोता, झोपेच्या ना ना रंगछटा उलगडत
गेल्या. अभ्यास रात्री जागून करायचा म्हणून डोळ्यावर न येणारी झोप आणि प्रेमात
पडल्यावर दोघे सोडून ‘बाकी जगाला वाटून टाकावी’ वाटणारी झोप यात बरीच तफावत होती.
पहिल्या प्रकारात खटाटोप तर दुसऱ्या प्रकारात विनासायास जागरण! बरं त्यातही सगळं
आलबेल असताना ‘गुंगारा’ देणारी झोप आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यावर ‘उडणारी’
झोप पण वेगळी. ते म्हणतात न प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं, ते त्यावेळी
झोपेलाही लागू बरं! रात्रभर जागरण झाल्याने होणारे दुष्परिणाम पण माफ होतात.
गदधे पंचविशी संपता संपता सगळ्या भूमिका
बदलायला लागतात तशा झोपेच्या ही तऱ्हा बदलतात. दिवसभराच्या रहाटगाड्यात कितीही
उशिरा, दमूनभागून अंथरुणावर पाठ टेकली तरी सकाळच्या ठराविक ठोक्याला उठणं काही
चुकत नाही. ऑफिस असो वा घरकाम, प्राधान्यक्रम बदलतो. अर्थात असा बदल केला नाही तर
जागेपणी पाहिलेली स्वप्नं पूर्ण न झाल्याचा ठपका झोपेवर नाही का येणार, झोपा काढत
राहिलो म्हणून? मग झोप शहाणी होते आणि ‘झोपी गेलेला वेळेत जागा’ होतो.
झोपेसोबत केलेला समझोता बरा चालू असताना काही
वेळा अशाही येतात जेव्हा हातात चिक्कार वेळ असूनही डोळ्यात झोपेचा पत्ता नसतो.
आपल्याला बरं नसताना, जवळचं कुणी आजारी असताना, मनात कसला तरी कल्लोळ माजलेला
असताना किंवा (ऐकीव अनुभव) वार्धक्य आल्यावर.... आराधना करून ही निद्रा देवी
ढुंकून पण पाहत नाहीत. आणि मग सहज गवसलेला सुखी माणसाचा सदरा किती मोलाचा होता ते
समजायला लागतं.
‘वामकुक्षी’ या झोपेच्या प्रकारात तर साखरझोपेला
टक्कर देण्याइतकी क्षमता आहे. त्यात तुडुंब भरपेट सुस्त दुपार असली तर झोप अनावर! डुलकी
सारखी काही मिनिटात refresh करणारी व्यवस्था
पण झोपेचीच देणगी! लहानपणी ओरडा खाण्यापासून वाचण्यासाठी केलेली झोपेची सोंगं आठवली,
की ‘झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं का करता
येत नाही’ हेही कळायला लागतं आपसूकच. असे झोपेवरून प्रचलित वाक्प्रचार वाचून काढले
तरी झोप किती बहूआयामी आहे हे लक्षात येईल.
असो.
(माझा इरादा नसला तरी) ‘लेख वाचून तुम्हाला झोप आवरली नाही’ असं व्हायच्या आत मीच
आवरतं घेते.
तोपर्यंत,
sleep tight (वेळच्या वेळी)!
कळावे,
आनंदमयी
उत्तम
ReplyDeleteChan
ReplyDeleteNice
ReplyDeleteझोपेचा एवढा विचार केलाच नाही पण वाचताना लक्षात आले ह्या सगळ्या प्रकारची झोप अनुभवली आहे
ReplyDelete