आदत से ...

 प्रिय,

‘बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे’ या नियमाला सवयीने सामोरे जातो आपण. कारण बदल म्हणजे तरी काय तर सवयीची replacement! जुनी सवय replace होते केवळ नव्यासोबत. offline वरून online येऊन, virtual platform वर रुळताना आणि 20 सेकंद handwash ने हात धुताना ह्याचा अनुभव घेऊन झाला आपला. ‘घराबाहेर न पडणे’ हा तर मुलांसाठी केवढा कठीण task. प्रचंड ऊर्जा घेऊन घरात बसण्याची चिमूरड्यांनी केलीच की सवय!

माणसं किंवा परिस्थिती सवयीची होणं हे कठीण असू शकतं; तसंच वरदान ही ठरतं. मला कणिक तिंबणे (सोप्या भाषेत पीठ मळणे) या प्रकाराचा अगदी आत्ता आत्तापर्यंत तिटकारा! वर्षानुवर्षाच्या सवयीने त्यातला नावडीचा भाग गळून पडला. सवयीने सोपं झालं.

वर्गात जाऊन मुलींसोबत (कारण मुलं लेक्चर बुडवण्यात तरबेज) प्रत्यक्ष गप्पा मारत शिकवणं आणि शिकणं हे अत्यंत आवडतं काम. गेल्या वर्षभरात online lectures ची सवय झाली. आवड बाजूला सरून सोय वरचढ ठरली. आता सोईचं ते सोपं झालं.

सवयीचं नसतंच तसं आईपण सुद्धा, लेकीसमोर आई म्हणून जगताना अंगवळणी पडत जातात हळूहळू काही गोष्टी. ज्या सोप्या भासतात जगाला तरी किमान!

‘कुणाचं ऐकायची सवय नाही आपल्याला’ असं ठणकावत सांगणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी ‘निमूट’ ऐकावं लागणं, ह्यात ‘दुर्लक्ष करण्याची सवय’ आपोआप develop होते.

स्वप्नापर्यंत नेणाऱ्या वाटा सोडाव्या लागून वहिवाट सवयीची करून घेणं... हे ही नसे सोपे! असे आयुष्य बदलून टाकणारे turning points सगळ्यांच्याच वाट्याला येतात. पाहणाऱ्याला सोपं वाटण्याइतपत, ती बिकट वळणं आपलीशी करणंदेखील एक achievement च.

सवय! माणसांची! ती आयुष्यात असेपर्यंत वाटतं, ‘यांच्याशिवाय जगणं नाही.’ मात्र नसताना? त्यांच्या नसण्याची सवय झाल्यावरही आठवणींचा अविभाज्य भाग बनून सवयीचेच राहतात ते ही सगळे.

अशा नकोशा कितीतरी गोष्टी स्वीकारतो आपण.... सवयीचा भाग झाल्यावर. म्हणजे हव्याशा गोष्टींसाठी नव्या सवयी जडवून घेणं अगदीच अशक्य नसायला पाहिजे, जसं चांगल्या बदलांसाठी चांगल्या सवयी बाणवणं! थोडं सजग राहून केलं तर ‘सवयींचे’ गुलामही ‘सवयींना’ गुलाम करू शकतील! आदत से ‘मजबूर’... पासून आदत से ‘मजबूत’ पर्यंत पोहोचता येईल. काय वाटतं?

कळावे,

आनंदमयी



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट