रंगांतर

 प्रिय,


कॅलेंडर वरून दरवेळी नजर फिरते तेव्हा, त्यावरची Glow & Lovely ची जाहिरात पाहूनसुद्धा माझ्या चेहऱ्यावर glow येतो. Fair & Lovely ने नाव बदलून Glow & Lovely केलं याचा मला मनापासून आनंद झाला. कोणतंही क्रीम चेहऱ्याचा रंग बदलणार नसतं. तरी जेव्हा ते खास गोरी कांती मिळवण्याचं आमिष दाखवून विकलं जातं तेव्हा मन खट्टू होतं.

आपल्यावर प्रेम करणारी माणसं रंगावरून जोखत नाहीत आपल्याला. दिसण्याच्या पलीकडे जाऊन असण्यावर जीव लावतात. मात्र आजूबाजूचं बरंच काही बिंबत रहातं नकळत. जसं, ‘वधू पाहिजे’ च्या जाहिरातीत, मुलगी गोरी हवी असते. गाण्यात गोरे गोरे गाल किंवा गोरीपानच वहिनी लागते. अप्रत्यक्षपणे सौंदर्याचा ‘गोरेपणा’ हाच मापदंड मनावर ठसत राहतो. जो एखाद्याचा स्वतःकडे आणि समोरच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गढूळ करू शकतो.

लेकीच्या जन्मानंतर आनंद व्यक्त करून झाल्यावर Dr ना मी अर्धवट शुद्धीत एकच प्रश्न विचारला, “गोरी आहे का?!” भलेभले प्रसंग विसरणारी मी, हा मात्र मनात घर करून राहिला. सावळ्या रंगामुळे कुणाचं माझ्यावरचं प्रेम आटलं, असं तर कधीच नव्हतं झालं. रंगामुळे कधी न्यूनगंड वगैरे फार काही फिरकला नव्हता माझ्यापाशी. मग? एका व्यावसायिक नाटकात, सगळ्या auditions पार आणि पास करून झाल्यावर ‘सेटला (नेपथ्य) शोभणार नाही काळीसावळी मुलगी’ या सबबी खाली एका प्रथितयश अभिनेत्रींनी मला नाकारलं होतं, याची टोचणी होती कुठेतरी. Power of subconscious mind! कधी, काय, कसं झिरपेल मनात सांगता येत नाही.

कधीतरी dusky skin चा ट्रेंड आला आणि गोऱ्यांना सावळेपणाचे वेध लागू लागले. (सावळ्या रंगाचा न्यूनगंड ते अहंगंड असा प्रवासही झाला असावा.) कधी एखादी जाहिरात येते आणि रंगाच्या पलीकडे प्रत्येकाकडे असणाऱ्या निव्वळ आत्मिक सौंदर्याला अधोरेखित करते तेव्हा, कर्तृत्वातलं, माणुसपण जपण्यातलं सौंदर्य वाखणण्याची सहजता हळूहळू रुजते आहे याचा आनंद होतो.
शाळेत जायला लागल्यानंतर एकदा लेकीने विचारलं, “आई, मी गोरी आहे की काळी?” अचानक आलेल्या अनपेक्षित प्रश्नामुळे गोंधळून गेले. त्वचेचा रंग कोणताही असला तरी तिच्या मनाला तो चिकटू द्यायचा नव्हता मला. ना गोरा न सावळा ना काळा न गव्हाळ. एकदा तो चिकटला की आतपर्यंत झिरपतो चांगलाच!
आणि म्हणून “तू सुंदर आहेस.” हे खरं उत्तर देऊन मी स्वतःला शाबासकी दिली.
बरं केलं ना?

कळावे,
आनंदमयी

Comments

  1. एकदा तू मला म्हणाली होतीस बघ, आपली पिढी जुन्या आणि आधुनिक पिढी यांच्या मधे लटकत राहणार बहुतेक!! .. पण बघता बघता आधुनिकतेत जिथे जिथे माणुसकी किंवा सहृदयता दिसेल तिथे ती पटकन स्वीकारली गेली सगळ्याच पिढ्यांकडून.. सुवर्णमध्य साधणारी आपली generation ☺ आणि तुझं ते उत्तर ( सुंदर आहेस) त्याचे सर्वोत्तम उदाहरण!
    मनात खोलवर घर करणारी आनंदमयी तुझी लेखणी!

    ReplyDelete
  2. खरं आहे गोरा रंग हेच सौंदर्याचे प्रमाण असते असं कळत नकळत आपल्या मनावर बिंबविले जाते आणि आपणही as you said subconsciously कुठे तरी तेच डोक्यात ठेवून react होतो हे पुढच्या पिढीच्या मनात येऊ नये ही आपलीच जबाबदारी आहे त्यासाठी तु सुंदर आहेस ह्या उत्तराला खरंच शाबासकी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट