सपने ... अपने अपने
प्रिय,
‘जावे स्वप्नांच्या गावा’ असं म्हणत रोज नाही तर किमान अधूनमधून आपण सगळेच स्वप्ननगरीची सफर करतो. ‘काल रातीला सपान पडलं’ असं कुणाला सांगायचा अवकाश; की आसपासच्या तीन चार जणांना आपल्याला पडलेली स्वप्नं सांगायची असतात. माझंही स्वप्नांचं विमान उंच उंच उडत अचानक कुठेतरी आदळतं (बरं तरी स्वप्नात दुखापत नाही होत).
Sci- fi movies ना लाजवेल एवढं काही, superfast गतीने घडत असतं त्यात. कधी हे विमान land करतं लहानपणीच्या आठवणीच्या ठिकाणी आणि पाठ वळत नाही तर वर्गात लेक्चर घेत असते तीच मी. (कूस बदलली की set change होतो की काय स्वप्नात?) लढाईच्या मैदानात तर कधी हीरो (की हिरोईन?) बनून शत्रूच्या तुकडीवर तुटून पडते (कुणास ठावूक कोण असतात ते दुश्मन !) ; तर कधी त्याच लढाईत गारद होऊन अज्ञात लढाईची साक्षीदार होते. आणि मनात स्वतःला दिलासा ही देते बरं... ‘हे स्वप्न आहे. जाग आली की जिवंत असू.’
स्टेज वर आयत्या वेळेला उभं केलं आहे आणि स्क्रिप्ट चा पत्ता नाही किंवा परीक्षेला गेले आणि अभ्यासच झालेला नाही, ही तर वारंवार पडणारी फजिती वाली स्वप्नं.
वास्तव आणि स्वप्नातलं अंतर गळून पडावं असंही होतं कितीदा. काही दुरावलेल्यांच्या अशा भेटी होतात, जणू कधी ते दूर गेलेच नव्हते. तर काही वेळा जिव्हाळ्याची, प्रेमाची माणसं दुरावल्याचा शोक स्वप्नातही इतका अनावर होतो की हुंदका देत जाग येते. स्वप्नांची सफर suffer ही करवते.
झोपेत पाहिलेल्या स्वप्नांची तऱ्हाच न्यारी. तरी जागत्या मनाच्या स्वप्नांनाही काही सीमारेषा नसते. फक्त ही स्वप्नं झोप उडवतात आणि कमालीच्या force ने रात्र रात्र जागवतात. स्वप्नांचा पाठपुरावा कधी पाठशिवणीचा खेळ होऊन बसतो कळत ही नाही. आपल्या सुप्त इच्छांना स्वप्नांचं रूप येतं, तसं काहीवेळा कुणा दुसऱ्याने दाखवलेल्या स्वप्नांनाही आपलंस करतो आणि स्वतःच्या स्वप्नांचे पंख त्याला जोडून भरारी घेतो आपण.
झोपेतल्या स्वप्नांच्या शेवटाचं काही नक्की नसलं तरी उघड्या डोळ्यांच्या स्वप्नांना आपल्याला हव्या त्या मुक्कामी नेण्याची जबाबदारी मात्र आपलीच. त्यासाठी ‘निंदिया आ जा री आ जा’ वाला राग कमी आळवून ‘जागो मोहन प्यारे’ चा सूर लावावा लागेल.
तोपर्यंत, “हम जो देखे सपने प्यारे, सच हो सारे... बस और क्या” हीच सदिच्छा
कळावे,
आनंदमयी
👍👌
ReplyDeleteमस्त👌👌👌
ReplyDelete