आनंदुःख
प्रिय,
आयुष्यात काही चांगलं घडलं की आनंद होतो. होतोच नाही का आनंद आपल्याला? फक्त आनंदच होतो का पण दरवेळी? काही प्रसंग नाण्याच्या दुसऱ्या बाजूसारखे, वाईटही वाटणं घेऊन येतात मनाच्या तळाशी, एकाच वेळी. दोन्ही तसं तात्पुरतंच.
बघा न, मोठी, दूरच्या पल्ल्याची सहल करायची म्हणून उत्साह संचारतो; तशी खर्चाच्या विचाराने रुखरुख सुद्धा लागतेच! मूल मोठं होतं, बाहेरच्या जगासाठी तयार होतं आहे याचं समाधान वाटत असतानाच; त्याचं बालपण निसटत चाललंय, कुशीत येणं कमी होतंय याची खंत! लेकीचं लग्न ठरल्याचा आनंद किती आणि दुःख किती याचा हिशोब तरी मांडता येत असेल का आई वडिलांना?
वाईट वाटणं सुद्धा एकटं नाही येत. त्याच्याही तळाशी सूक्ष्म आनंद असतोच. जशी, शाळा संपल्याच्या दुःखाच्या शेवटी कॉलेजची चाहूल आनंदाची लहर आणते. असं बरंच काही.
तर संपूर्ण आनंद वा संपूर्ण दुःख असं काही नसावंच बहुतेक भौतिक जगात. हवं असतं दोन्हीही ..... एकाच वेळी; समतोल राखायला. कारण केवळ दुःखच नाही तर कदाचित सुखही 100% निर्भेळ मिळालं तर झेपणार नाही आपल्याला. अर्जुनाला तरी कुठे लगेच झेपलं विश्वरूप दर्शन? तिथे आपली काय बिशाद! तेवढी कुवतही नाही म्हणा आपली. विश्वरूप दर्शनाची कितीही इच्छा असली तरी प्रत्यक्ष दर्शनाने हर्ष होण्याऐवजी भीतीने गाळण उडेल.
त्यामुळे आनंदा सोबत येणाऱ्या चिमूटभर विरुद्ध भावनेची दखल घेत आणि दुःखातही दुरान्वयाने का होईना दिलासा देणाऱ्या विचाराचा आदर ठेवत, आयुष्याची सम साधण्यात ही मजा आहे. आणि मग आनंद आणि दुःख असं आळीपाळीने जगता जगता अद्वैताप्रमाणे येणारे ‘आनंदुःख’ ही लज्जत वाढवेल आयुष्याची.
काय म्हणता?
कळावे,
आनंदमयी
छान लिहिलं
ReplyDeleteआनंदुःख मस्त संकल्पना सुखाला दुःखाची आणि दुःखाला सुखाची झालर असतेच जी जगण्याची गंमत वाढवते 👍
ReplyDelete