हास्य फुलोरा

 प्रिय,

लेकीने कुठूनसा एक खेळ शोधून आणला आहे, ‘try not to laugh challenge’! कितीही हसवायचा प्रयत्न केला तरी समोरच्याने हसायचं नाही मुळीच. आणि अशाच धर्तीवर एक reality show सुद्धा नुकताच पाहिला. खेळ म्हणून ठीक आहे, मात्र खरंच हास्यास्पद विनोदावरही हसू न शकण्याची वेळ कुणावर येऊ नये. हसणं ही नैसर्गिक गरज आहे माणसाची. अनावधानाने दिलेला प्रतिसाद सुद्धा स्मितहास्यानेच पूर्ण होतो बहुतांश वेळा. आणि त्यावर रोकथाम म्हणजे गुदमरल्यासारखं होईल.
हसण्याचे सारे संदर्भ एकेका अनुभवानुसार बदलत जातात. कधी मधाळ, मोहक हसण्याने कुणाच्या काळजात कट्यार घुसते आणि तीच ‘मुसकुराने की वजह’ बनून जाते. जगण्याच्या रेट्यात, सख्यांच्या गराड्यात दिलखुलास, गडगडाटी हसणं सगळी दुखणी पळवून लावतं. व्यवहाराच्या दुनियेत काही वेळा ओठांवर हसू दिसलं तरी नजरेतून कुत्सितपणा डोकावतो. हसण्यामागचा सगळ्यात अवघड undercurrent म्हणजे ‘मुसकुराऊ कभी तो लगता है... जैसे होटो पे कर्ज रखा है.’ कारण डोळ्यात पाणी काढणं जितकं तुलनेने सोपं; तेवढंच चेहऱ्यावर हसू पसरवणं कठीण... दुसऱ्याच्या आणि कधी स्वतःच्या देखील. फक्त एकदा यावर मात केल्यावर, मळभ दूर सरलं की जसा लख्ख उजेड मनाला तजेला देतो तसं होतं.
अशा वेळी बोळक्या तोंडावर विनाकारण फुलणारं हसू म्हणजे आसपास च्या एरवी ‘सकारण’ हसणाऱ्यांनाही निमित्त! कार्टूनच्या नुसत्या ‘ट्ऑइंग’ आवाजावरही खळखळून हसणारे चेहरे निरागसतेचे प्रतिकच. कधी काळी ‘मोठं कधी होणार’ ची वाट पाहणारे आपण सगळेच; मोठे झाल्यावर ‘लहानपण दे गा देवा’ ही विनवणी त्या बिनशर्त निरागस हसण्यासाठीच करत असू.
म्हणूनच विनोदी ढंगाच्या मालिका किंवा कार्यक्रमांना प्रचंड पोचपावती मिळत असावी. अक्कल गहाण टाकून logic less सिनेमा पाहणे हीसुद्धा remedy च म्हणावी. दरवेळी दर्जेदार विनोद निर्मितीच हसवण्यासाठी धावून यायला हवी असं नसलं, तरी पुलंच्या विनोदावर ‘फुटणे’ म्हणजे सुदृढ मानसिक आरोग्यासाठी रामबाण म्हणावा. एरवी केवळ लिखाणातून हास्यकारंजे फुलवणे येरागबाळ्याचे काम नव्हे.
तर येनकेनप्रकारेण, हसणे थांबता कामा नये. त्यासाठी say cheese everyone!!!

कळावे,
आनंदमयी

Comments

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट