मनाचिये गुंती ...

 

प्रिय,

बहिणाबाई म्हणून गेल्या, ‘मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा...’ पहिल्यांदा वाचताना, शिकताना बाहेरच्या जगाची उदहारणं relate करत अर्थ फक्त समजून घेतो आपण. त्याचा रोजच्या जगण्यात प्रत्यय यायला लागला; की खऱ्या अर्थाने कळतं ठायी ठायी वाटा किती दमवतात, रिझवतात आणि गुंतवून ठेवतात आपल्याला. बहिणा बाईंनी जितकं सोपं सुटसुटीत करून सांगितलं तितकंच ते क्लिष्ट, गुंतागुंतीचं असतं.
मनातल्या मनात किती काही सुरू असतं नाही? खरं तर नुसतं मनात नाही तर ‘मनातल्या मनातल्या मनात’ म्हणायला हवं. बाहेर (स्वतःच्या बाहेर) कुणाच्या लक्षात ही येत नसावं इतकं बेमालूमपणे. एकाच वेळी!
बघा न, मनात, हातातल्या कामाबद्दलचे विचार, (त्याचवेळी) मनातल्या मनात, इतर व्यावहारिक जबाबदाऱ्यांच्या विचारांचं रिंगण! मनाच्या आणखी आतल्या कंगोऱ्यात कधी येऊ घातलेल्या सण समारंभाची तयारी मनात सुरू होऊन संपते देखील. शिवाय त्या दरम्यान चार pending कामं आठवून तीही उरकली जातात. . . . मनातल्या मनातल्या मनात! सोबत एखाद्या मैत्रिणीला भेटून मारायच्या गप्पांचीही उजळणी सुरू असते. मध्येच एखादा विचार ट्रॅक सोडून भलतीकडे भरकटतो. त्याला हाकायचं कामही मनाच्या कुठल्याशा डिपार्टमेंट कडे असतंच.
घर, ऑफिस, सुट्टी, नवं काही करायचे वेध, जुन्याला आदरपूर्वक विसरायचे प्रयत्न, नात्यांचे गुंते, मैत्रीची घट्ट वीण, संसाराचा रहाटगाडा या शिवाय समांतर असं काही सुरू असतं, जे स्वतःबद्दल असून इतरांशीही काही नातं सांगत असतं. आणि आठवणींचा ओघ तर अखंड, अव्याहत! कुठला कसलाही संदर्भ असो वा नसो, त्या आपल्या वाहत राहतात मनात आणि सोबत वहावत नेतात आपल्यालाही. हुश्श! कित्ती काय पेलवतं हे मन!
या सगळ्याच्या पल्याड मनाच्या गाभाऱ्यामध्ये सुरू असते एक धून! केवळ आपल्यालाच नादावणारा सुरेल पावा! त्या सूर लहरींवर दिवसच्या दिवस भुरर्कन उडून जातात. मागे वळून पाहताना त्या त्या दिवसांचा आठवांचा पिसारा; प्रसंगापेक्षा त्या वेळच्या जाणीव-नेणीवेने भारलेला दिसतो, ऐकू येतो तेव्हाच्या सुरावटीसकट. वाटतं, त्या सुरेल लहरींवर; आयुष्य आपल्याच ‘आतल्या नादात’ निघून जावं.
तथास्तू !
कळावे,
आनंदमयी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट