healing

 

 प्रिय,

    एखाद्या कामाच्या निमित्ताने किंवा फिरायला म्हणून, काही दिवसांची किंवा अगदी एखाद दिवसाची बाहेरची मोठी, दमवून टाकणारी फेरी करावी लागली; की जवळपास सगळ्यांना येणारा अनुभव म्हणजे शेवटचे दिवस/तास सरता सरत नाहीत. थकून जातो जीव. कधी एकदाचे घरी पोहोचतो असं होऊन जातं. आणि घराजवळ पोहोचेपर्यंत आणलेलं उसनं अवसान, घर दिसताच गळून पडतं. एक एक पाऊलसुद्धा उचलणं कठीण होतं. एकदा का घरात अंग झोकून दिलं की काय तो जीव शांत होतो!

    आजारी असताना, हॉस्पिटलमध्ये असलो, तर डॉक्टर आणि सगळ्या औषधांच्या मध्ये safe वाटायला हवं खरं. तरी जीव कावून जातो आणि घरी गेल्यावरच काय ते बरं वाटेल मला, असं सगळ्यांना सांगतो. आणि खरंच घरीच बरे होतो. नाही का?

    असं घर बरं करतं. इथे सुरक्षित वाटतं. शांत होतं मन. उसनी अवसानं नाही आणावी लागत. कारण थकलेलं, आजारी, चिडलेलं, हरलेलं असं कसंही असलो तरी घर सांभाळून घेतं. Healing चं feeling इथेच येतं.

    अशीच काही माणसं सुद्धा असतात, असावी आयुष्यात जी घराचं काम करतात आपल्यासाठी. बाहेरच्या जगात तोंडदेखलं का होईना आनंदी, हसत राहण्याचं सुद्धा एक कामच होऊन बसतं काही वेळा. आतून तुटलेलं, नाकारलेलं, हरलेलं असलं तरी मुखवटा लागतो खंबीरपणाचा. कारण माहीत असतं ‘तग धरायचा’ आहे!

      अशा वेळी लागतात ही घरं! ऊब द्यायला. आधाराला. उभारी द्यायला. Healing साठी! ही घरं नाही करत मागणी कोणत्याच अभिनयाची. नको असतो कसलाही आव. नाही लावत ही घरं कोणतंही लेबल आपल्याला. तुझ्याकडून अमुक अपेक्षा नाही, असा सूर न लावता, निरपेक्ष प्रेमाने, आहे तसं स्वीकारत बरं करतात ही घरं!

      अर्थात निरपेक्ष म्हणता; अशा घरांची संख्या कमीच असणार आणि पत्ते शक्यतो कायमचे! आई वडील, नवरा बायको, भाऊ बहीण, मुलं, नणंद भावजयी अशी कुटुंबाच्या परिघात येणारी तर हक्काची काही घरं! त्याबाहेरही काही घरांवर हक्क सांगता येत असला तर बहारच.

     अशी मोजकी पण पक्की घरं म्हणजे जगण्याची उमेद कायम!

    या सगळ्याची आणखी एक गंमत म्हणजे, नकळत आपणही घर होऊन जातो, इतर कुणासाठी! कुणासाठी आपण घर बनणं सुद्धा एक उपचार असू शकतो बरं! त्यातही उभारी देण्याचं सामर्थ्य असतं.

    आयुष्यात सगळ्यांच्या वाट्याला अशी ‘पक्क्या पायाची’ सुरेख घरं येवोत, अशीच सदिच्छा!

 

कळावे,

आनंदमयी

Comments

  1. खूप छान लिहिलं, I love my home

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आशेचं फूल

गिफ्ट