मन तरंग
प्रिय, मस्त पावसाला सुरुवात झाली की ‘खमंग भजी आणि वाफाळता चहा’ हा बेत झाला नाही, असं होणारच नाही. हो ना? मात्र घरी कितीही घाट घातला तरी ‘पावसाळी घाटातल्या’, गाडीवरच्या ह्याच बेताची आठवण सतावते. काय कनेक्शन असतं काही गोष्टींमध्ये! सांगून समजत नाही. पण असतं एवढं नक्की. तसंच कळण्यापलिकडचं काही अधूनमधून डोकावत रहातं. वाहावत घेऊन जातं आपल्याला सोबत. मग ते एखादं गाणं असो की पदार्थ! कुठच्या कुठे कनेक्ट करतं आपल्याला! बरं त्या गोष्टी फार काव्यात्मकच असायला हव्यात असंही नाही. म्हणजे उदाहरणार्थ, माझं होतं असं काही वेळा, बाजारात फिरताना एखाद्या दुकानासमोरून जाताना तिथल्या अगरबत्तीचा सुगंध नाकाशी दरवळतो आणि क्षणात आजोळच्या वाड्याशी तार जुळते. कुळथाच्या पीठिचा वास म्हणजे चाळीतल्या कुडकर आजींच्या घरातून येणारा चविष्ट सुगंध. गावठी तुपाचा चमचा जिभेवर टेकवताच विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधली शम्मी अंकल कडची डिनर सेटची प्लेट आणि डोसा दिसायला लागतो. या जोडण्या कधी होतात कुणास ठावूक. लहानपणी कधीतरी बसलेले असतात हे सुगंध आणि चवी नाकात. विक्रोळीला आम्ही राहत असतानाचा काळ म्हणजे माझं वय वर्ष दोन केवळ. तरी पस्...